महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची 57 वी बैठक मुंबई येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. शिर्डी विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे, यादृष्टीने अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यात एव्हीएशन फ्युएलिंग डेपोसाठी इंडियन ऑईलला जागा देणे, टर्मिनल इमारतीचा विस्तार, धावपट्टीची लांबी 2500 मीटर्सवरून 3200 मीटर्स करणे, पार्किंग तसेच अन्य सुविधा निर्माण करणे आदींबाबत यावेळी निर्णय घेण्यात आले. छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर तसेच बेलोरा, चंद्रपूर, धुळे, सोलापूर इत्यादी विमानतळांच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. नागपुरातील मिहान भागात अनेक कंपन्या असल्याने आणि भविष्यातील एकूणच गरजा लक्षात घेता या भागात एक व्यापारी संकुल उभारण्याच्या संकल्पनेला आज संचालक मंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. याचा सविस्तर आराखडा पुढील बैठकीत सादर करण्यात येईल.