एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी त्यांच्या गटासाठी 'शिवसेना- बाळासाहेब ठाकरे' असं नाव पक्कं केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असणारे एक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
शिंदे गटाने स्वीकारलेल्या या नावाला शिवसेना आक्षेप घेण्याची शक्यता आहे. लवकरच या नावाच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे. हा गट मुंबईत कधी येणार, सत्तास्थापनेसंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे.
"बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापना केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं स्वतंत्र अस्तित्व असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणूक लढवूनही भाजपपासून दूर झालो. तेव्हा भाजपचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्व संपवायला आपले मित्रपक्ष निघाले तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे", अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं.