Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. त्यातील १२ खासदार आता फुटले; या सर्वांना घेऊन एकनाथ शिंदे उद्या मोदींना भेटणार

eknath shinde
, सोमवार, 18 जुलै 2022 (22:08 IST)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका दिला आहे. शिंदे यांनी तब्बल ४० आमदारांना फोडून पक्षात फूट पाडली आहे. त्यानंतर आता शिंदे यांनी मोठा सुरुंग लावला आहे. शिवसेनेचे तब्बल १२ खासदार फुटले आहेत. या सर्वांची आज येथे बैठक झाली आहे. या सर्व १२ खासदारांना घेऊन शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (मंगळवार, १९ जुलै) येथे भेट घेणार आहेत.
 
शिंदे यांनी नवा गट स्थापन करुन उद्धव यांच्यासमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. भाजपच्या मदतीने हे सर्व करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिंदे यांनी सेनेचे तब्बल ४० आमदार फोडले. त्याचबरोबर १० अपक्ष आणि अन्य पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा मिळविला. परिणामी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि आता शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री झाले आहेत. परिणामी, ५५ पैकी अवघे १५ आमदारच शिवसेनेकडे राहिले आहेत. त्यातच आता शिंदे यांनी मोठा धक्का उद्धव यांना दिला आहे.
 
शिंदे यांनी तब्बल १२ खासदारांना फोडले आहे. या सर्व खासदारांची आज येथे बैठक झाली आहे. राष्ट्रपती पद निवडणुकीत या सर्वांनी मतदान केल्यानंतर हे खासदार एकत्र आले आहेत. आता हे सर्व जण शिंदे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. हे सर्व खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे घटक असल्याचे सांगणार आहेत. परिणामी, शिवसेनेकडे केवळ सहाच खासदार राहणार आहेत. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ आता शिवसेनेचे संसदेतील ही गटनेते पद जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. त्यातील १२ खासदार आता फुटले आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या पाठिशी केवळ सहाच खासदार राहिले आहेत. त्यात विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर या खासदारांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात जालन्यातील टोळीला पोलिसांनी पकडले