गद्दारांच्या मतदारसंघातही गेलो सर्व ठिकाणी लोकांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंनाच असल्याचे दिसून येत आहे, असे सांगत मुंबईने देशाला मार्ग दाखवला आहे. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजेच शिवसेना असल्याचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसंवाद यात्रेदरम्यान मुंबईतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते.
या शिवसैनिक निर्धार मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी अनेकविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक विचारणा करत नुसत्या रिकाम्या खुर्च्या दाखवण्यापेक्षा या कट्टर शिवसैनिकांची गर्दी माध्यमांनी दाखवावी, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. मी वरळीत असताना आले नाहीत, छत्रपती संभाजीनगरला गेल्यावर वरळीत आले. त्यांची हिंमत झाली नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण वरळीसह मुंबईत अनेक सुधारणा केल्या. सुशोभिकरणाची कामे केली. ऐतिहासिक असलेल्या जांबोरी मैदानासाठी अडीच कोटी खर्च केले. मात्र, या भाजप आणि ४० गद्दारांच्या सरकारने विविध कार्यक्रम घेऊन या मैदानाची वाट लावून टाकली. आपण सुरू केलेली अनेक कामे या सरकारने बंद केली. मुंबईभर पोस्टर लावून पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. किती खर्च करायचा तो करू द्या. सामान्य शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
Edited By- Ratnadeep Ranshoor