Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष हत्या प्रकरण, सहा जणांवर गुन्हा तर दोघांना अटक

शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष हत्या प्रकरण, सहा जणांवर गुन्हा तर दोघांना अटक
, गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:22 IST)
लोणावळा येथील शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी (वय 38) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
 
शेट्टी यांची सोमवारी (दि. 26) सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालत हत्या केली होती. भरचौकात, वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या खुनाच्या घटनांमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली. शेट्टी यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सौम्या शेट्टी (वय 36) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
 
त्यानुसार पोलिसांनी मोबिन इनामदार (वय 35, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव), कादर इनामदार (वय 33, रा. भांगरवाडी), सूरज आगरवाल (वय 42, रा. लोणावळा), दीपाली भिलारे (वय 39, रा. लोणावळा), सादिक बंगाली (वय 44, रा. गावठाण, लोणावळा) आदींसह एका अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला. सूरज आगरवाल, दीपाली भिलारे या दोघांना पोलिसांनी अटक केली. वडगाव मावळ न्यायालयात त्यांना हजार केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेट्टी यांची हत्या ही नियोजनपूर्वक, पूर्ववैमनस्यातून व प्रेमसंबंधांतून झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
 
मंगळवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घटनेची माहिती घेतली. लोणावळ्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने जयचंद चौक, बाजारपेठ परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. हत्येप्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच, सूत्रधारांची नावे निष्पन्न होत असून, घटनेतील हल्लेखोर व अन्य एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, त्याच्या व प्रत्यक्षदर्शीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
 
हल्ल्याची होती कुणकूण
अटक केलेल्या सूरज आगरवाल याच्याकडून पाच दिवसांपूर्वी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, कोयता, रेम्बो चाकू हस्तगत करत त्यास अटक केली होती. त्याची लगेचच जामिनावर मुक्तता झाली होती. अगोदर झालेला हल्ल्यांचा प्रयत्न व लोणावळ्यात सापडलेला शस्त्रसाठा, यामुळे आपल्यावर हल्ला होणार याची शेट्टी यांनी कुणकूण लागली होती. हत्येच्या दोनच दिवसआधी शेट्टी यांनी पोलिसांची भेट घेत संरक्षण मागितले होते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' गावात छापत होते बनावट नोटा, दोघा संशयितांना अटक