केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा समावेश न करण्यात आल्यानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीका केली आहे. मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच असतात. कधी एखादा जोकर किंवा गुलाम राजा होईल व राजाची अवस्था गुलामासारखी होईल ते सांगता येत नाही. नव्या विस्ताराबाबतही यापेक्षा वेगळे काही घडल्याचे दिसत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच असतात. कधी एखादा जोकर किंवा गुलाम राजा होईल व राजाची अवस्था गुलामासारखी होईल ते सांगता येत नाही. नव्या विस्ताराबाबतही यापेक्षा वेगळे काही घडल्याचे दिसत नाही. पंतप्रधान मोदी हे चीनला जाण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खासकरून सांगण्यात येत होते. आता चीन दौऱ्याशी या मंत्रिमंडळ विस्ताराचा काय संबंध? जणू काही नव्या मंत्रिमंडळाची यादी जॅकेटच्या खिशात ठेवून मोदी चीनला गेले नाहीत तर शी जिनपिंग हे नाराज होतील व डोकलामचा वाद पुन्हा उकरून काढतील. त्यामुळे चीन दौऱ्याआधी विस्तार केला नाही तर आभाळ कोसळेल असे चित्र निर्माण केले ते गमतीचे होते. चार-पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतरही विस्ताराचे पत्ते पिसता आले असते.
नव्या विस्तारात १३ मंत्र्यांची उलथापालथ झाली आहे. नऊ नव्या मंत्र्यांना हळद लावली असून त्यात चारजण माजी नोकरशहा आहेत. धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे, तर नऊ नवे राज्यमंत्री घेण्यात आले. त्यात आर.के. सिंग हे माजी केंद्रीय गृहसचिव व डॉ. सत्यपाल सिंह या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. अल्फोन्स कन्ननथनम व हरदीपसिंग पुरी या निवृत्त नोकरशहांनाही सरकारात सामील केले आहे.