सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
हा पुतळा नौदलाने उभारला होता आणि वाऱ्याने कोसळला असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. लवकरात लवकर नवीन पुतळा उभारण्यात येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'शौर्याला सलाम' म्हणून 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे कामाच्या दर्जावरून आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर हा पुतळा उभारण्यात आलेला होता. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अजूनही स्पष्टपणे कळू शकलेलं नाही. हा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ) आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा आ. वैभव नाईक यांनी केली आहे.हा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाची तोडफोड केली.
त्यांना केवळ मोदींच्या हस्ते पुतळा उभारायचा होता, दर्जाशी देणंघेणं नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारवर टीका केली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. या सरकारला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा होता. त्यांना कामाच्या दर्जाशी कसलंही देणंघेणं नाही."
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं की, "देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे."
सुप्रिया सुळे यांनी लिहिलं की, "विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे."
'शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो, पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना'
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आम्ही देवाप्रमाणे त्यांची पूजा करतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उदघाटन झालं होतं. पण त्याठिकाणी जोरदार वारे वाहत होते. 45 किमी प्रतितास वेगाने, तिथे वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे नौदलाने डिझाईन केलेला आणि नौदलानेच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. आमचे मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण तिथे गेले आहेत आणि घटनास्थळाचा आढावा घेत आहेत."
"मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. विभागीय आयुक्त माझ्यासोबत इथे आहेत. आम्ही लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मजबुतीने उभा करणार आहोत," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit