अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरीच नजरकैदेत ठेवलं आहे.
येथील राजापेठ उड्डाणपुलाजवळ विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राणा दांपत्याला नजरकैदेत ठेवून त्यांच्या इतर कार्यकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं, अशी माहिती मिळाली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच परवानगी घेतली नाही, हे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने तो पुतळा तत्काळ हटवला.
त्याला राणा समर्थकांनी विरोध दर्शवला होता. राणा दांपत्य आणि इतर कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस-प्रशासनाचा निषेध सुरू ठेवला.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवलं.
यानंतर परिसरातील काही कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आल्याचं वृत्त आहे. याशिवाय संपूर्ण परिसरात कठोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर करण्यात येत होता. हे सर्व आरोप राणा यांनी फेटाळून लावले.
पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना नवनीत राणा म्हणाल्या, "सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली."
"बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी महाराजांबद्दल कुणी काही बोललं तरी सहन होत नव्हतं. पण त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास परवानगी मिळत नाही. महाराजांचा पुतळा रात्रीतून अचानक हटवण्याचं काम प्रशासन करत आहे," असं नवनीत राणा म्हणाल्या.
महापालिकेची भूमिका काय?
या प्रकरणात महापालिकेची बाजू समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवण्याची कारवाई जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली. राणा यांनी बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याने तो हटवण्यात आला. त्यासोबतच शहरातील अण्णाभाऊ साठे यांचा एक पुतळाही विनापरवाना बसवण्यात आला होता. तोसुद्धा हटवण्यात आला आहे."
"पुतळा बसवण्यासाठी गृहमंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे सर्वप्रथम ती परवानगी घ्यावी, अशी सूचना आम्ही राणा यांना केली आहे. दोन्ही पुतळे अतिशय सन्मानाने महापालिकेच्या राजापेठ येथील स्टोअरमध्ये सुखरूप ठेवण्यात आले आहेत," अशी माहिती आष्टीकर यांनी दिली.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
अमरावती येथील उड्डाणपूलावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्री पोलिसांनी हटवला त्यामुळे यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने देखील यात उडी घेतली आहे.
भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
"पुतळा हटवून प्रशासनाने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. जनभावनेचा अनादर या मोगलाई सरकारने केला," असा आरोप कुलकर्णी यांनी केला.
पण काँग्रेसने मात्र यासंदर्भात भाजपकडेच बोट दाखवलं आहे, "अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत," असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं.
राणा दांपत्य आणि शिवसेनेतील वाद काही नवा नाही. अमरावती जिल्ह्यात राणा दांपत्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर एक दृष्टिक्षेप टाकू.
कायम सत्तेच्या जवळ असणारे राणा?
रवी राणा बडनेरामधून अपक्ष आमदार आहेत, तर नवनीत राणा अमरावतीच्या अपक्ष खासदार. रवी राणा कायम सत्तेच्या जवळ राहिलेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना राणांचे आघाडीच्या नेत्यांसोबत जवळचे संबंध होते. मात्र, 2015 साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले.
अविनाश दुधे सांगतात, "भाजपसोबत राणा यांचे संबंध उघड आहेत. रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात."
याआधी, शेतकऱ्यांच्या मुद्यावर आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या राणा यांना ताब्यात घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केलं तर कारागृहात डांबलं! शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन 'मातोश्री'वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले तर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध! 25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?"
अविनाश दुधे सांगतात, "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना राणा यांनी कायम भाजपवर हल्लाबोल केला. आता भाजपशी त्यांची जवळीक असल्याने त्यांचं टार्गेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत."
राणा संधीसाधू आहेत का?
रवी राणांना कायम सत्तेसोबत रहाण्याची सवय आहे. मात्र, 2019 साली भाजपला समर्थन देऊन त्यांचा अंदाज चुकला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राणा सत्तेजवळ रहाण्यात अपयशी ठरलेल्याचं राजकीय जाणकारांच मत आहे.
राणा यांचं राजकारण जवळून पहिलेले अविनाश दुधे सांगतात, "राणांना कोणतीही राजकीय भूमिका नाही. ते कायम सत्तेजवळ राहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांमुळे त्यांना संधीसाधू राजकारणी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही."
राणा नेहमीच राजकीय सोयीचं राजकारण करत आल्याचं, लोकसत्ताचे पत्रकार मोहन अटाळकर यांचंही मत आहे.
नवनीत राणा आणि शिवसेना वाद
नवनीत राणांनी 2011 साली राजकारणात पाऊल ठेवलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तेव्हापासूनच शिवसेना विरुद्ध राणा असा राजकीय वाद सुरू झाला. 2019 च्या निवडणुकीत हा वाद पराकोटीला पोहोचला.
* 2014 च्या निवडणुकीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. अडसूळ यांनी या आरोपांचा इन्कार केला होता.
* 2018 मध्ये अडसूळांनी राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
* त्यानंतर रवी राणा यांनी अडसूळांवर खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला.
* 2019 मध्ये आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप केला. वाद कोर्टात गेला. नवनीत राणा हायकोर्टात जिंकल्या.
मोहन अटाळकर सांगतात, "आनंदराव अडसूळ हे राणा यांचे परंपरागत विरोधक आहेत. लोकसभा निवडणुकीत दोघे दोन वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिवसेना राणांच्या निशाण्यावर नेहमीच आहे. त्यांना अमरावतीत दुसरा कोणी शत्रू नाही. काँग्रेसला दुखवू नये अशी त्यांची भूमिका असते."
मोहन अटाळकर यांच्यामते, रवी राणा यांना राजकीय भूमिका नसल्याने आणि सत्तेच्या कायम जवळ रहाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने. त्यांच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह उभं रहातं.