कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणातच सोमय्या कर्जत तहसीलदार यांना भेटले.
रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केलंय. कर्जत तहसील कार्यालयात माहितीच्या अधिकारात चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली.