Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘शिंदे गटात ठिणग्या उडताय, एक दिवस मोठा स्फोट होईल’…

sanjay raut
, शनिवार, 3 डिसेंबर 2022 (08:29 IST)
नाशिक – न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर प्रथमच खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ४० आमदारांना सांभळण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होत आहे. त्यातच सारे दिवस निघून जाताय. शिंदे गटात अनेक ठिणग्या उडताय. एक दिवस नक्की मोठा स्फोट होईल, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
 
नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर नेहमीप्रमाणे सडेतोड भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  ४० आमदारांना जपण्यासाठी जीवाची रान करत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री हे फक्त गटाचे मंत्री आणि ४० आमदारांसाठीच आहेत. नाशिक शिवसेनेबाबत ते म्हणाले की, नाशिक शहर शिवसेना ही कधीही डॅमेज झालेली नाही. त्यामुळे डॅमेज कंट्रोलचा प्रश्नच येत नाही. शिवसेना नवीन चिन्हावर देखील विजय होईल. शिवसेनेला कधीही तडा गेलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
राऊत यांनी यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर कडाडून टीका केली. गोडसे यांचे राजकीय करिअर संपले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे जनतेत असंतोष आहे. तेच आता गद्दारांना धडा शिकवतील. बंडखोर आमदारांना राज्य सरकारने सुरक्षा दिली आहे. मात्र, सत्ता गेल्यावर त्यांचीही सुरक्षा जाईल. आम्ही राज्यात बिना सुरक्षा फिरतोय. हिंमत असेल तर त्यांनी सुरक्षाकाढून फिरावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.
 
राऊत यांनी दिवार चित्रपटातील डायलॉग बोलून बंडखोर आमदार आणि खासदार यांच्या मुलांना जनता गद्दार म्हणतील, अशी टीका केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावांबद्दल सध्या मोठा वाद सुरू आहे. त्यावरुन राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुल्लू भर पाण्यात डुबकी घेणे आवश्यक आहे. आता क्रांती करण्याची वेळ आली आहे, असे राऊत म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MPSC चा गतिमान कारभार! पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड व गुणवत्ता यादी जाहीर