दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात संकेत स्थळ असावं, असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या 'दिव्यांगसाथी' या विशेष संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल. या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३ टक्के खर्च योजना, विमा, पेंशन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणं सोपं जाणार आहे.