Publish Date: Thu, 09 Apr 2026 (13:24 IST)
Updated Date: Thu, 09 Apr 2026 (15:12 IST)
सिल्लोड आगारात कार्यरत असलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक शरद विठ्ठल भिवसने (वय ४०) यांनी वरिष्ठांकडून होणाऱ्या सततच्या छळाला आणि जातीवाचक शिवीगाळीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे एसटी महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शरद भिवसने हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामावर हजर झाले होते. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी आर.एल. पार्क परिसरातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या तीन अधिकाऱ्यांची नावे नमूद केली आहेत.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
भिवसने यांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी खालील तिघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय काळवणे (डेपो मॅनेजर), किरण अवसरमल (वाहतूक निरीक्षक) आणि विकास चव्हाण (लिपिक).
पोलीस तक्रारीनुसार, हे तिन्ही अधिकारी भिवसने यांना गेल्या अनेक दिवसांपासून विनाकारण मानसिक त्रास देत होते. त्यांना जातीवाचक शब्दांत बोलून अपमानित करणे आणि मुद्दाम लांबची ड्युटी लावण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार सुरू होते. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेचे वृत्त समजताच एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. निषेध म्हणून सिल्लोड आगारातील बस सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती, ज्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही प्रचंड रोष आहे.
वेबदुनिया न्यूज डेस्क
Publish Date: Thu, 09 Apr 2026 (13:24 IST)
Updated Date: Thu, 09 Apr 2026 (15:12 IST)