Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

उद्यापासून १२ वीची परीक्षा, विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेला यावे

state board exam in maharashatra
, मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (15:08 IST)

राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी 14 लाख 85 हजार विद्यार्थी बसले आहेत. बुधवारपासून  (दि. 21) बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. राज्यात 2 हजार 822 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. राज्य मंडळाकडे 9 हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकूतला काळे यांनी  दिली. 

विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेला यावे अशी पुन्हा एकदा आठवण मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. वेळेत न येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्याने खबरदारी घ्यावी असं मंडळाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेआधीच परिक्षा केंद्रावर यावे. उशीर झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. अशी माहिती मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांनी दिली. व्हॉट्सअॅपवरून पेपर फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकीट पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील 2 विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतरच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप पेपरफुटीला आळा घालण्यासाठी पेपरला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिके मुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच 10 वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरविण्यांवर प्रथमच बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे. 

बुधवारी 11 ते 2 या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सुट्टीच्या दिवशी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी दिली. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील. केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स, टेलिफोन बुथ बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट