सातत्यानं वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा आता कमी होत आहे. शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचे दिलासादायक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मात्र तरीही धोका टळलेला नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची, असल्याचे त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, राज्यात 1 नोव्हेंबरला कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 16 लाख 83 हजार 775 इतकी होती. तर, सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 25 हजार 109 इतकी होती. 5 डिसेंबरला एकूण रुग्णसंख्या 18 लाख 47 हजारांवर होती. तर, उपचार घेणाऱ्या अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 82 हजार 849 इतकी कमी झाली होती. ही एकंदर कडेवारी पाहता कोरोनातून सावरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची बाब समोर येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटवर भर दिला. राज्यातील रिकव्हरी रेट हा 94 टक्क्यांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील कोरोना रुग्णांचा डबलिंग रेटही 350 दिवसांवर गेल्याचं टोपे म्हणाले.