नाशिकमध्ये रेमडेसिवीरसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत असतांना हे रेमडेसीव्हीर वाटपाची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र काही रूग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. हा प्रकार समोर आणताच यंत्रणा खडबडून जागी झाली. याप्रकरणी भुजबळांनी तातडीने संबधित विभागाच्या राज्य सचिवांशी चर्चा करून यावर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकार्यांनी याप्रकरणी औषध कंपनी आणि अशोका हॉस्पिटलला नोटीस बजावत आपल्याकडील साठा जमा करण्याची नोटीस बजावल्याचे समजते.
हॉस्पिटलला थेट उत्पादकांकडून औषध खरेदी करण्याची मुभा अन्न व औषध प्रशासनाने दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार नाशिक मधील अशोका हॉस्पिटलने थेट उत्पादकाकडून खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे.
मात्र खरेदीची मुभा जरी दिली असली तरीसुद्धा सद्यस्थितीत रेमीडीसिविरचा निर्माण झालेला तुटवडा विचारात घेता रुग्ण संख्येपेक्षा अव्यावहारिक रित्या जास्तीचा साठा थेट उत्पादकाकडून हॉस्पिटल्सने प्राप्त करून घेणेसुद्धा अभिप्रेत नाही, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे.
त्या अतिरिक्त साठ्या संदर्भात आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना लिखित स्वरूपात आज दिल्या आहेत.
त्याचबरोबर उत्पादक कंपनीशी सुद्धा संपर्क करून त्यांनी कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून केंद्रीय पद्धतीने वाटपासाठी अधिक कोटा जिल्ह्याला उपलब्ध राहील.
नाशिक जिल्ह्यात आपण थेट हॉस्पिटल ला कोटा वाटप करण्याची सुरू केलेली कार्यपद्धती परिणामकारक ठरत असून त्यामुळे उपलब्धतेच्या प्रमाणात, अत्यवस्थ रुग्णांना औषध पोहोचवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय कंट्रोल रूम द्वारे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे.