राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे. नवाब मलिकांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारविरोधात युवक आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.
ईडी कार्यालयाच्या बाहेर आणि अगदी हाकेच्या अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. ई़डी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच त्यांच्या हातात पोस्टर्स आणि काही बॅनर्स देखील आहेत. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
नवाब मलिक चांगल्या प्रकारची कामं करत असताना हे लोकं त्यांना का त्रास देतात, अशा प्रकारचा सवाल कार्यकर्त्यांकडून विरोधकांना विचारला जात आहे. कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, भाजप पक्षातील नेते लोकांचा रोजगार काढून घेत आहेत. तसेच त्यांनी लोकांना कामं सोडायला लावली आहेत. गोरगरीब जनतेला प्रचंड त्रास दिलाय. मात्र, नवाब मलिक चांगल्या प्रकारची कामं करत असून त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केला जातोय, अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी दिली आहे.