सध्या महाराष्ट्रात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोविड बरोबरच डेल्टा, ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने फैलावत असून ही परिस्थितीत आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ओमायक्रॉनची राज्यातील परिस्थिती याबाबतचे सुत्रा कार्नोसियम संस्थेने आज ऑनलाईन सादरीकरण केले. सादरीकरणात कोविड विषाणूं बाबत आतापर्यंत केलेला अभ्यास प्रामुख्याने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, संशोधन यावेळी सादर केले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ.कोहली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर, संबंधित संस्थेचे डॉक्टर, आदी,उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, सध्या तरी राज्य शासन, केंद्र शासन आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी कोविडसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहे. १५ जानेवारी २०२२, रोजी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांकडून वर्तविण्यात येत असल्याने राज्य शासन कोविड संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न करीत आहे. संबंधित संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून कोविड बाबत केलेल्या अभ्यासासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तातडीने सादर करावा. विद्यापीठाने हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या अहवालाचा अभ्यास करण्यात येईल.
महाराष्ट्रासह मुंबईतसुद्धा कोविड संसर्गाबरोबरच ओमायक्रॉन संसर्ग होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनीच अधिक खबरदारी आणि सतर्कता पाळणे आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी राज्य शासन करीत आहे. सतत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर, आणि लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करण्यावर राज्यातील वैद्यकीय यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.