Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे

नाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे
सध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करण्याबाबतची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी असे काही नसून हे देसाई यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. मागील १५ वर्षांत पहिल्यांदाच मंत्र्यांचे असे व्यक्तिगत मत मी ऐकतोय, शिवाय मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता मंत्री अशी घोषणा करतानाही मी पहिल्यांदा पाहतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केली. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
मुंबईचा विकास आराखडा मुंजूर झाल्याचे आम्हाला ट्विटरवरून कळले. खरंतर नाणारचा विषय गाजत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे केले गेले असल्याचा आम्हाला संशय आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. काल सरकारतर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची नावे घोषित झाली. मात्र त्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांचे नाव वगळले गेले आहे. या भागांचा नीट अभ्यास केला गेला नाही. या ठिकाणी पाऊसकाळ कसा आहे हेही पाहिले गेले नाही, असे यातून स्पष्ट होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 
तसेच, विधान परिषदेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे सूतोवाच तटकरे यांनी केले. नाशिक, कोकण व परभणी या जागा आधीच राष्ट्रवादीकडे आहेत. पण लातूर मध्येही आमचे संख्याबळ जास्त आहे. म्हणून आम्ही लातूरच्याही जागेची मागणी करणार आहोत. चर्चा सुरू आहे, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेली चार वर्षे मी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत पक्षाची धुरा माझ्या खांद्यावर होती. या चार वर्षांत आम्ही चोख पद्धतीने विरोधी पक्षाची बाजू मांडली. माझ्या कारकीर्दीत अनेक निवडणुका आल्या. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पिछेहाटीवर गेलो होतो त्या अनुषंगाने आम्ही नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. हल्लाबोल आंदोलन करून सरकारला जाब विचारला. आम्ही प्रभावी भूमिका बजावली याचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त करतानाच पुढे माझा विचार न करता इतरांना संधी द्यावी असं मत पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. या कालावधीत पत्रकारांनी जे सहकार्य दिलं त्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे आभार मानले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच