निलंगा येथील एका शेतकऱ्याने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली असून याच कारणास्तव लातूरच्या शितल वायाळ या तरूणीने आत्महत्या केल्याची घटनाही ताजी आहे. राज्यात हुंडाबळी तसेच हुंड्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे, त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठविला आहे. हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्या प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी सुळे यांनी जळगाव येथे संवाद दौऱ्यादरम्यान केली. हुंड्याविरोधात कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली. १ मेपासून मराठवाड्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत हुंडा विरोधात जागर कार्यक्रम हाती घेतला जाणार असून शेतकरी आत्महत्या आणि स्त्री भ्रूणहत्येवरतीही जागर केला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.