ऑनलाईन वर्गात शिकवलेले विद्यार्थ्यांना किती आत्मसात केले, हे पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमातून चाचणी घेतली जाणार आहे.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचण्या होणार आहेत. त्यानंतर ऊर्दू माध्यमाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार आहे. एससीईआरटी आणि पुणे व लिडरशीप फॉर इक्विटी आणि कॉन्व्हेजिनियस यांच्या माध्यमातून हे स्वाध्याय तयार करण्यात आले असून, दर शनिवारी स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गणितातील 10 आणि भाषेतील 10 प्रश्न सरावासाठी पाठवण्यात येणार आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत. दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे देताच त्यांच्या कामगिरीचा अहवाल विद्यार्थ्याला मिळणार आहे. जेणेकरून त्यांना स्वत:च्या कामगिरीचे मूल्यमापन करणे शक्य होईल आणि ते सक्षम होऊ शकती, हा त्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा अहवालही शिक्षकांना देण्यात येणार आहे.
पहिली ते दहावीच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील.त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील असे परिषदेने म्हटले आहे.