मुंबई : उद्धव ठाकरे काल जनतेसमोर आले, ते बोलतायत हे पाहूनच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. भाजपच्या विरोधात शिवसेनेनं आता महाराष्ट्राच्या बाहेरही लढायचं ठरवलं आहे, असं राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी म्हटलं की, आम्हाला लगेच कदाचित यश मिळणार नाही, पण उद्या नक्की मिळेल. भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपला ललकारले आहे.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राऊत म्हणाले की, भाजपला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत नेल्याचं सांगताना ठरवलं असतं तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमिनीवरुन आकाशापर्यंत पोहचवलं, हे सर्वांना माहितीय. आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे.
राऊत म्हणाले की, ही केवळ शिवसेनेची गोष्ट नाहीय. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागलीय. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असं काम केलंय, असं त्यांनी म्हटलं आहे.
राऊत म्हणाले की, एक हिंदू पार्टी देशात वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यात अडचण ठरणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. आम्ही एका विचारसणीचे लोक आहोत. तुम्ही मोठे असो आम्ही छोटे असो विचार वाढत राहिला पाहिजे, असाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला, असंही राऊत म्हणाले.
भाजपकडून काम झाल्यानंतर फेकले जाते, महाराष्ट्रात खडसे, मुंडेंची गरज संपल्यानंतर फेकून दिले
भाजपला जेव्हा सत्ता हवी होती, तेव्हा हिंदुत्व समोर आले. भाजपकडून काम झाल्यानंतर फेकले जाते. राजकारणात आवश्यकता संपल्यावर दूर केले जाते, हेच त्यांचे धोरण आहे. वापरा आणि फेकून द्या हेच भाजप राजकारणात करते. गरज संपली, तर फेकून देण्याचे काम भाजपकडून आजवर झाले आहे. गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांच्याबाबत काय झाले हे पाहिलेच असेल. तुम्ही पाहिलच असेल महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचे काय झाले ? मुंडे परिवाराचे काय झाले ? संपूर्ण देशात हे असेच सुरू आहे, रामविलास पासवान परिवाराचे काय झाले हेदेखील सगळ्यांनी पाहिले आहे.