Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महादेव मोरेः पिठाची गिरणी चालवून 38 पुस्तकं लिहिणारा प्रतिभावान लेखक काळाच्या पडद्याआड

Shradhanjali RIP
, बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (14:52 IST)
निपाणी येथे राहाणारे ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचे आज 21 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांची मत्तीर, हेडाम, झोंबड, चिताक, चेहऱ्यावरचे चेहरे अशी अनेक पुस्तकं गाजली.
विडी कामगार, कामगार महिला, झोपडपट्टीत राहाणारे लोक, डोंबारी, टॅक्सीवाले अशा समाजातल्या अगदी तळागाळातील लोकांचे मोरे यांनी बारकाईने निरीक्षण केले.
महादेव मोरे बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील निपाणी या शहरात धान्य दळणाची गिरणी चालवत होते. यावेळेस त्यांचा समाजातील विविध लोकांशी संपर्क आला आणि तेच त्यांच्या लेखसंग्रहात, कादंबऱ्यांमध्ये उतरलं.
 
2016 साली महादेव मोरे यांची मुलाखत घेऊन 'मुलुखमाती' या पुस्तकात ती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या मुलाखतीवर आधारित लेख आज येथे प्रसिद्ध करत आहोत.
निपाणीचे लेखक महादेव मोरे पिठाच्या गिरणीत काम करतात, असं एका कथाकाराकडून समजलं. पण ते पटलं नाही. कारण 17 कादंबऱ्या, 17 कथासंग्रह, 4 ललितलेख संग्रह एवढं लिहिलेला हा लेखक उदरनिर्वाहासाठी पिठाच्या गिरणीत काम करत असेल?
 
ऐकतानाही कसंतरी वाटत होतं; पण सांगणारा त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. मला मोरे यांच्या लिखाणाबाबतची माहिती होती, त्यामुळं तेवढ्या वेळेपुरतं त्याचं म्हणणं मी खरं मानलं. पण त्यांच्याबद्दल ऐकलेली ही वेगळी माहिती स्वस्थ बसू देत नव्हती. मोरेंच्या पुस्तकावर त्यांचा पत्ता होता, ‘कामगार चौक, निपाणी.’
निपाणीतला कामगार चौक म्हणजे, छोट्या मोठ्या घरांची वस्ती. चौकात एका तरुणाला विचारलं,
 
‘लेखक महादेव मोरेंचं घर कुठं आहे?’
‘दादा आता हिकडं राहात नाहीत. बेळगाव नाक्यावर जाऊन विचारा. तिथं गॅस एजन्सीच्या जवळ त्येची गिरण हाय.’
गिरणीजवळ आलो. गिरणी सुरू होती. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पायजमा घातलेले सत्तरी ओलांडलेले एक गृहस्थ चक्कीजवळ उभे होते. हेच महादेव मोरे! मराठी साहित्यात भरीव योगदान दिलेले लेखक, कन्नड मुलखात राहूनही आग्रहाने मराठीतून लिहिणारे.
 
त्यांच्याकडे पाहिल्यावर ते लेखक असतील, असं कोणालाच वाटणार नाही, इतके साधे. मला पाहताच म्हणाले, ‘दळण न्हाय आणलं?’ बोलण्यात कोल्हापुरी सूर. त्यांना वाटलं होतं, मी दळायलाच आलोय.
 
‘एवढं झाल्यावर मी बंद करणार हाय, म्हणून म्हटलं.’
 
मग मी त्यांना ‘मी दळायला नाही तुम्हाला भेटायला आलोय’, असं सांगितलं.ते म्हणाले, ‘थोडा वेळ थांबा. एवढं दळण होऊ द्या.’दळण झाल्यावर त्यांनी गिरणी बंद केली. अंगावर सांडलेलं पीठ झाडत बाहेर आले. मग सुरू झाल्या, मनमोकळ्या गप्पा.

महादेव मोरेंचे वडील टॅक्सीचालक. घरची परिस्थिती बेताचीच. त्यांना नऊ भाऊ, तीन बहिणी. हे सगळ्यात थोरले. प्राथमिक शाळेत असताना त्यांना वाचनाचा छंद लागला. तेव्हा ते गुरुजींकडून मिळणाऱ्या साहसी कथा, रहस्यकथांची पुस्तके वाचायचे. दिवसेंदिवस त्यांचं वाचनाचं वेड वाढतच गेलं.
 
हायस्कूलच्या काळात त्यांनी साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांची पुस्तके वाचली. निपाणीला हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या गोखले कॉलेजात आले. या काळातही त्यांनी मनसोक्त वाचन केलं.
 
वाचताना त्यांच्या मनावर नवकथाकार अरविंद गोखले यांच्या कथांचा प्रभाव पडला. पुढे खेड्यात भरणाऱ्या यात्रेवर त्यांनी ‘म्हाईचा दिवस’ ही कथा लिहिली. ती कथा एका स्पर्धेसाठी पाठवली. गंमत म्हणजे, त्या कथेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
पहिल्याच कथेला बक्षीस मिळाले, ही घटना मोरेंनाही खरी वाटत नव्हती. त्यांच्यासाठी तो एक सुखद धक्का होता. बक्षीस मिळाल्यानंतर मात्र त्यांनी सगळे लक्ष लेखनाकडे वळवले. याच काळात त्यांना शिक्षण सोडून निपाणीला यावे लागले. कारण ते इंटरआर्टच्या इंग्रजी विषयात नापास झाले. फक्त परीक्षेसाठी कोल्हापुरात थांबण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं.
 
मग, निपाणीतच राहून काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय करावा, असं मोरेंना वाटलं. तेव्हा त्यांनी मित्रांच्या समवेत निपाणीत चार चाकी गाड्यांचं गॅरेज सुरू केलं. या गॅरेजमध्ये त्यांना नाना तऱ्हेची माणसं भेटायची.
 
दिवसभर गॅरेजमध्ये काम करताना ऐकलेले वेगवेगळे अनुभव त्यांच्या मनाला भिडलेले असायचे. रात्रभर जागून तेच अनुभव मोरे लिहू लागले. त्यातूनच काही कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या.
 
या लेखकाच्या कथा पुण्या-मुंबईच्या दर्जेदार साहित्य मासिकांतून छापून यायला लागल्या. दूरवरून वाचकांची पत्रे यायला लागली. लेखकांच्या वर्तुळातही या लेखकाची चर्चा व्हायला लागली.
 
काही लेखक पत्रे पाठवून कौतुक करू लागले. पण मोरेंना याचं अप्रूप वाटत नव्हतं. ते नित्यनेमाने गॅरेजला जायचे. फावल्या वेळेत लिखाण करायचे.
 
ते सांगतात, ‘तेव्हा एका कथेला दहा रुपये मानधन मिळायचे. हे पैसेही खूप असायचे, कारण दहा रुपयात आठवड्याचा बाजार यायचा. कथा छापून आल्यानंतर अनेक दिवसांनी हे मानधन यायचे.’
पंधरा वर्षे गॅरेजमध्ये काम केल्यावर मोरे यांनी टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ते सर्वत्र फिरू लागले. या ड्रायव्हरकीच्या काळातील अनुभवाबाबत मोरे सांगतात, ‘तेव्हा रोज नवी माणसं भेटायची.
 
प्रवास करताना माणसं त्यांचे अनुभव सांगायची, त्यातले अनेक अनुभव ऐकून माझ्या जिवाची घालमेल व्हायची. मग ऐकलेलं कागदावर उतरवून काढायचो. त्यातूनच अस्थिर जीवनाची शोकांतिका मांडणारी ‘एकोणिसावी जात’ कादंबरी मी लिहून काढली.
 
एक-दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हरचे काम केल्यानंतर मोरे त्यांच्या भावाची पिठाची गिरणी चालवू लागले.
गेल्या तीस वर्षांपासून ते पिठाच्या गिरणीत काम करतात. या गिरणीत दळण घेऊन येणाऱ्या बायका कष्टकरी कुटुंबातील असायच्या. काही बायका देवदासी, विधवा, परित्यक्ता होत्या. त्या गिरणीवाल्या दादाला विश्वासानं मनातल्या गोष्टी सांगायच्या. या बायकांना दादा आधार द्यायचा.
 
अनेकदा दारूड्या नवऱ्याच्या बायका दादाकडं नवऱ्याची तक्रार घेऊन यायच्या. त्यांची दुःख या संवेदनशील गिरणीवाल्या दादाला छळत राहायची. मग शोध सुरू व्हायचा. या शोधातूनच लिखाण सुरू व्हायचं.
 
रात्री 11 वाजता लिहीत बसलेला हा लेखक कोंबडा आरवल्यावरच भानावर यायचा. गिरणीतील काम संपल्यावर तिथच बाकड्यावर बसून लिहायला बसायचा.
 
गिरणीतल्या याच बाकड्यावर बसून त्यांनी ‘चेहऱ्यामागचे चेहरे’, ‘चिताक’ हे राज्य सरकारने पुरस्कार दिलेले कथासंग्रह लिहिले आहेत. संपूर्ण देशभरात चर्चा झालेल्या निपाणीच्या तंबाखू आंदोलनावरची ‘झोंबडं’ ही कादंबरी याच गिरणीच्या बाकड्यावर बसून त्यांनी लिहिली आहे. तीस वर्षे पिठाची हीच गिरणी महादेव मोरे यांची ‘स्टडी रुम’ बनली आहे.
तुम्हाला गिरणीत काम करायला आवडते?’ हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात,
 
‘न आवडून काय करायचं? कर्तव्य म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात.’ त्यांनी सांगितले.
 
‘केवळ लिखाण करून प्रपंच चालवणं शक्य नाही. लोकांना वाटतंय, लेखकाला लिहून खूप पैसे मिळत असतील; पण काही खरं नाही. संसारासाठी कष्ट करावे लागतातच...’
 
याच गिरणीच्या पाठीमागे मोरेंचं घर आहे. घरात त्यांच्या सांधेदुखीने आजारी असलेल्या पत्नी होत्या.
 
मी बसलो होतो, त्या खोलीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या फ्रेम लावलेल्या. त्यांच्या पत्नीशी गप्पा मारत बसलो. काही वेळातच मोरे आतून चहा घेऊन आले. त्यांनी स्वत: बनवून माझ्यासाठी चहा आणलेला. मी संकोचलो.
 
‘अहो, चहा कशाला आणला?’
‘तुम्ही कशाला पुन्हा येताय एवढ्या लांब. खरं जेवणाचं करायला पाहिजे हुतं, पण माझी बायको जाग्यावरच असते. तिला काम जमत न्हाय. म्हणून कुणीबी मला फोन करून भेटायला येऊ का असं विचारलं, तर मी नको म्हणतो. बाह्यरगावावरनं आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला तर पायजेल. पण माझ्याकडनं तो होत नाही. म्हणून वाईट वाटतं,’ ते म्हणाले.
‘दादा, तुम्ही भेटला हेच लय महत्त्वाचं. तुम्ही मनाला लावून घेऊ नका,’ मी म्हणालो.
 
‘तुम्ही कानडी मुलखात राहूनही मराठीत लिहिताय. तुमची महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आहे?’ मी विचारलं.
 
‘अहो, सरकारच्याच मागं इतकं व्याप हाय. आपुण कशाला त्यास्नी ताप द्यायचा. हात चालत्यात आणि डोळ्याला दिसतय तोवर लिहायचं. कसलीही अपेक्षा करायची नाही बघा.’ मोरे निरागसपणे म्हणाले.
 
आम्ही बोलत बसलेलो.
 
‘दादा...’ बाहेरून आवाज आला. मघाच्या बाई आल्या होत्या.
‘आलो... आलो...’ म्हणत ते उठले. मीही उठलो. बाहेर आलो. ते गिरणीत गेले. गिरणी सुरू केली. पाठोपाठ दळण चक्कीत टाकलं. स्वतःचं लेखकपण विसरून ते गिरणीवाल्या दादाच्या भूमिकेत गेले होते. त्यांचा निरोप घेऊन मी निघालो.
आज लेखकराव व्हायच्या काळात विपुल लिहूनही जमिनीवर पाय असणारा, लिहिणं आणि जगणं यात तफावत नसणारा महादेव मोरे नावाचा एक माणूस आणि त्याचं जगणं मला बघायला मिळालं होतं.
मी तिथून दूर आलो, आता मला गिरणी दिसायची बंद झालेली. पण गिरणीचा आवाज मात्र कानात घोंघावत होता, आणि गिरणीवाले दादाही माझ्या डोळ्यासमोर येत होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला, अधिकाऱ्यांचा दावा