Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय चाललंय?

ajit panwar
, शनिवार, 22 जुलै 2023 (11:20 IST)
राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संदिग्ध चित्र आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदेंच्या शिवसेनेतही अस्वस्थता कायम असल्याचं दिसतं. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना आज (22 जुलै) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक ट्वीट केलं आहे.
 
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवार यांचा एक व्हीडिओ पोस्ट करत म्हटलंय, 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच'
 
'#अजितपर्व' असाही उल्लेख त्यांच्या ट्वीटमध्ये आहे.
 
भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये अजित पवार या्नी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.. यानंतर 14 तारखेला अजित पवारांना अर्थ खातंही देण्यात आलं. याला काही दिवस होत नाहीत, तोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झालीय.
 
या चर्चेला नव्याने सुरुवात झाली ती मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानासमोर लावलेल्या एका पोस्टरमुळे. शुक्रवारी (21 जुलै) 'अजित पवार भावी मुख्यमंत्री' असा संदेश असलेले पोस्टर्स थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर लावण्यात आले होते. या पोस्टरबाजीनंतर अधिवेशनातही सगळीकडे याची चर्चा होती.
 
शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा बॅनर्सवरून खटके उडल्याचंही वृत्त आहे. परंतु याबाबत सत्ताधारी पक्षाकडून कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अजित पवार मुख्यमंत्री झाले तर वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
खरं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा कार्यकर्त्यांनी किंवा आमदारांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीर पोस्टरबाजी केलीय. स्वतः अजित पवार यांचीही मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही.
 
अजित पवार यांचं मुख्यमंत्री पद पक्कं आहे की नाही म्हणजेच ते मुख्यमंत्री होणार की नाही, हे तर अद्याप स्पष्ट नाही. पण गेल्या काही दिवसांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातत्याने सुरू असलेल्या भेटीगाठी, यानंतर
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसत असलेली राजकीय संदिग्धता, संभ्रमावस्था आणि मोठ्या संख्येने आमदारांची वेट अँड वाॅचची भूमिका हे चित्र सुद्धा नाकारता येणार नाही.
 
आता यामागे 'अजित पवार मुख्यमंत्री होणार' हे कारण आहे की राष्ट्रवादीच्या गोटात आमदारांना वेगळीच चिंता आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी 54 आमदारांपैकी कोणाच्या बाजूने किती आमदारांचं संख्याबळ आहे हे मात्र उघड झालेलं नाही आणि याचं कारण म्हणजे अधिवेशन सुरू असूनही विधानभवनात गैरहजर राहत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार.
 
16 जुलै रोजी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधानभवनात अजित पवारांच्या बाजूने सत्ताधारी बाकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार बसणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. परंतु कामकाजाचा एक आठवडा उलटला तरी दोन्ही गटातले राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 15 ते 20 आमदार गैरहजर राहत असल्याने संभ्रमाचं वातावरण आहे.
 
राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर विशेषत: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्यानंतर विधानसभेत नेमकं काय होणार? राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिकांमध्ये काम कसं करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
 
शिवाय, अजित पवार गटाने दावा केलेल्या 40 आमदारांचं पाठबळ प्रत्यक्षात विधानभवनात त्यांच्याकडे आहे का? हे सुद्धा स्पष्ट होईल असं अपेक्षित होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही विधानसभेत हजर रहायचं टाळलं.
 
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यासंदर्भात बोलताना सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सोडले तर बाकी सगळे वेट अ‍ॅण्ड वाॅचच्या भूमिकेत आहेत. मग ह्यामागे अनेक कारणं असू शकतात. अजित पवार मुख्यमंत्री होतील अशीही अपेक्षा अनेक आमदारांना आहे. यासाठीही ते थांबलेले असू शकतात. तर काहींना आणखी मंत्रिपदाची अपेक्षा असू शकते."
 
शिवाय, राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाले असले तरी दोन्ही गटातील आमदारांमध्ये संवाद आणि मैत्री कायम आहे. इतकच काय तर शरद पवार यांच्यावर टीका, टिप्पणी केल्यानंतरही अजित पवार गटातील नेते आणि आमदारांचा शरद पवार यांच्याशीही संवाद कायम आहे.
 
"आमदारांनी अद्याप आपला परतीचा मार्ग बंद केलेला नाही. म्हणून शरद पवार यांची भेट घेणं असो वा त्यांचा आर्शीवाद घेणं असो आमदारांनी शरद पवार यांच्याशी संवाद बंद केलेला नाही. पवार कुटुंबही एकत्र आहे असंही त्यांना वाटत आहे," असंही सुधीर सूर्यवंशी सांगतात.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ आमदाराने दिल्याने माहितीनुसार,"राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांची मतदारसंघात अडचण होत आहे. मतदारसंघात शरद पवार यांना वर्षानुवर्ष मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांनाही आम्हाला, आमदारांना दुखवता येणार नाही."
 
"शरद पवार यांच्याबाबत जनतेत, मतदारांमध्ये सहानुभूती आहे. मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा नेमका अंदाज अजून आम्हाला येत नाही. निवडणुकीच्या काळात त्यांच्या भावना काय असतील हे सुद्धा आम्हाला पहावं लागेल," असंही त्यांनी सांगितलं.
 
परंतु आत्ता आम्ही अजित पवार यांच्यासोबतच आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार सांगतात, "फक्त आमचेच आमदार गैरहजर आहेत असं नाही सर्वच पक्षाचे आमदार गैरहजर राहत आहेत. आमचा आकडा छोटा आहे म्हणून तुम्हाला दिसत आहे. भाजपचे 105 आमदार आहेत त्यांचीही अनुपस्थिती मोठी आहे."
 
परंतु यामुळे संख्याबळ कळू शकत नाहीय, काय कारण आहे गैरहजर राहण्यामागे?
 
यासंदर्भात बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,"मतदारांमुळे येत नसावेत.
 
याच कारणामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (17 जुलै) अजित पवार गटातील आमदारांनी वाय. बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.
 
ही भेट घडली कारण आमदारांनी अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांची भेट घडवून आणा असा आग्रह केल्याची माहिती एका आमदाराने भेटीनंतर दिली.
 
यामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार अजूनही संभ्रमात असल्याचं दिसून येतं.
 
"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार केवळ हजेरी लावण्यासाठी विधिमंडळात येतात पण विधानसभेत बसत नाहीत, कारण पक्षात फूट पडल्यानंतर कोणतीही एक बाजू घ्यायचं ते टाळत आहेत." असं ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात.
 
"संभ्रमात असलेल्या किंवा मतदारसंघातला मत प्रवाह पाहून काही आमदारांना तूर्तास तरी तटस्थ रहायचं आहे किंवा ते त्यांच्या फायद्याचं आहे असं वाटतं,"असंही ते सांगतात.
 
शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षातील फूट स्पष्ट होती. आमदारांनी नेतृत्त्व स्वीकारत आपली अधिकृत भूमिका तात्काळ जाहीर केली होती. दोन गटात सीमारेषा स्पष्ट दिसत होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही सीमारेषा पुसट आहे.
 
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार काही आमदार सोडले तर बाकी सर्व एकप्रकारे लपंडाव खेळताना दिसतात. त्यांना शरद पवार यांनाही दुखवायचं नाहीय आणि अजित पवार यांनाही दुखवायचं नाहीय. म्हणूनच दोन्ही गटाकडूनही व्हिपबाबतची कारवाई असो वा अपात्रतेची प्रक्रिया काहीच होताना दिसत नाहीय."
 
2 जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादीतील 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले.
 
या बंडानंतर अजित पवार गटातील नेत्यांनी आमच्याकडे 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा केला होता. पण निश्चित आकडा आजतागयत कोणत्याही एका गटाकडून सांगितला गेलेला नाही.
 
पक्षात फूट पडल्यानंतर 5 जुलै रोजी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही गटांकडून जाहीर बैठकांचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला विधानसभेचे 31 आमदार उपस्थित होते.
 
यानंतर 13 जुलै रोजी खाते वाटपासंदर्भात अजित पवार यांना थेट दिल्ली गाठावी लागली आणि 14 जुलै रोजी अजित पवार यांना अर्थ खातं आणि इतर मंत्र्यांनाही मोठी खाती देण्यात आली.
 
तर याच दिवशी अजित पवार आपल्या काकींची म्हणजेच प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले.
 
यानंतर 16 जुलै रोजी आपल्या मंत्र्यांसह त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. तर 17 जुलै रोजी आपल्या आमदारांसह ते पुन्हा वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
 
आमदारांची गैरहजेरी पाहता आणि हा घटनाक्रम लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याबाबत संभ्रमावस्था असल्याचं दिसून येतं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस
 
दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जातात, निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेलं असलं तरी दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसून येतं.
 
दरम्यान, शरद पवार गटाकडून मात्र आपण विरोधक म्हणूनच भूमिका बजावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
हिंदुत्ववादाचा प्रचार कसा करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना मतदारसंघात आपली प्रतिमा काय बनेल याची जशी चिंता आहे तसंच आव्हान भाजप-शिवसेना युतीसोबत असल्याने हिंदुत्ववादाचा प्रचार कसा करणार याचंही आहे.
 
आता अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू असताना हा मुद्दा पुन्हा महत्त्वाचा ठरतो की राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्ववादाचा प्रचार करणार का? विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? लव्ह जिहाद, लँड जिहाद, अशा विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या विशिष्ट मागण्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय?
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका आमदाराने सांगितलं, "माझ्या मतदारसंघात माझे हजारो मुस्लीम मतदार आहेत. राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष विचारधारेचा पक्ष आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारधारा स्वीकारलेली नाही."
 
यासंदर्भात आणखी एका आमदाराला विचारले असताना त्यांनीही हेच उत्तर दिलं. "आम्ही हिंदुत्ववादी विचार स्वीकारला असं नाहीय. भाजपसोबत आल्याने आमची अशी प्रतिमा होऊ नये किंवा लोकांमध्ये संदेश जाऊ नये म्हणून आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील."
 
भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला भाजपचं हिंदुत्व मान्य आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,"शरद पवार यांना ज्याप्रमाणे शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे त्याप्रमाणे."
 
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली आहे. यामुळे विद्यमान आमदाराचे मतदार हे आघाडीचे मतदार आहेत. आताच्या परिस्थितीनुसार या आमदारांनी हिंदुत्ववादी पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवली तर त्यांना फटका बसू शकतो असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात.
 
"सत्ताधारी पक्षासोबत गेल्याने विकासकामं आणि निधी मिळत असला तरी ग्राऊंड लेव्हलला मतदारांमध्ये पर्सेप्शन महत्त्वाचं असतं. आपला आमदार किंवा उमेदवार कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या विचारांच्या युतीकडून निवडणूक लढवत आहे हे मतदारसंघात एकगठ्ठा मतांसाठी महत्त्वाचं असतं. यामुळे अजित पवार गटाला याचा फटका बसू शकतो आणि याचा फायदा शरद पवार गटाला किंवा काँग्रेसला होऊ शकतो," असंही ते सांगतात.
 
सुधीर सूर्यवंशी पुढे सांगतात, "पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी युती केली असली तरी जमिनीवर ती सहसा लगेच स्वीकारली जात नाही. यामुळे अजित पवार यांनाही याचा विचार करावाच लागेल,"
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांना मतदारसंघात याची अडचण होऊ शकते. विशेषत: अल्पसंख्याक मतदारांवर जिथे विजयाचं गणित अवलंबून आहे तिथल्या आमदारांना याबाबत निश्चितच अडचण होईल असंही जाणकार सांगतात.
 
आता अजित पवार यांची पुढील राजकीय रणनिती काय आहे? यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.
 
या आणि अशा अनेक कारणांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आजही दोन्ही दगडावर पाय ठेऊन आहेत. जाहीररित्या ते कोणाचीही बाजू घेत नाहीत आणि हे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत मतदारांमध्येही संभ्रम कायम ठेवण्यातच त्यांचा फायदा असल्याचं त्यांना वाटतं हेच सध्यातरी दिसून येत आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर : अहमदनगर मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त