दि. ०१ जानेवारी २०१७ रोजी नाशिकचे पालकमंत्री ना.गिरिष महाजन यांच्या मार्गदर्शना खाली होणारे महाआरोग्य शिबिर हे नुसते आरोग्य तपासणी शिबिर नसून विविध रोगांपासून मुक्ति देऊन निरोगी व सुखी जीवनाचा गुरुमंत्र देणारे शिबिर आहे, असे सर्वांना वाटले पाहिजे. आरोग्याचा कुंभमेळा आपण नाशकात साजरा करूया असे प्रतिपादन जे.जे. रुग्णालयाचे डीन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. महाआरोग्य शिबिराबाबत भाजपा मध्यवर्ती कार्यालय वसंतस्मृति येथे आयोजित समन्वयक कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ. लहाने बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महाआरोग्य शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, भाजपा शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आहेर, भाजपा जालना जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादरगे, पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील, मनपा गटनेते सतिष कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, गोपाळ पाटील शहर शिवाजी गांगुर्डे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुरेश पाटील, संभाजी मोरूस्कर, काशिनाथ शिलेदार, कुणाल वाघ, दिनकर आढाव, संदीप जाधव, अनिल भालेराव आदि उपस्थित होते.
नाशिकचे पालकमंत्री ना. गिरिष महाजन यांच्यामुळे या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधि आपणास मिळाली आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे आणि आपल्या शेजारी असलेले आजारी बघा आणि हजारो रुग्णांना या शिबिराचा लाभ कसा मिळवून देता येईल ह्या दृष्टीने पाऊले उचला असे आवाहन ही डॉ. लहाने यांनी आपल्या मनोगतात केले. रुग्णांनचे आशिर्वाद नेहमीच कामी येतात. मी रोज ५०० हून अधिक रुग्ण तपासतो, आत्ता पर्यंत मी १.५ लाख शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यामुळेच माझे जीवन आनंदी आहे. नाशिक येथे संपन्न होत असलेल्या शिबिराच्या निमित्ताने मी ६ दिवस येथे राहणार आहे. मी केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर रुग्णांनची तपासणी ही करणार आहे. मुंबईहून ७०ते ८० डॉक्टरांचे पथक येथे येणार आहे, असेही डॉ.लहाने यांनी पुढे नमूद केले.
नाशिक येथे होणार्या महाआरोग्य शिबिरात शासकीय यंत्रणा बरोबरच सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. गांवात घरोघरी जाऊन रुग्ण शोधा आणि त्यांना या शिबिराचा लाभ मिळवून द्या. असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी आपल्या भाषणात केले. ना.गिरिष महाजन यांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य भरात झालेल्या महाआरोग्य शिबिराची तसेच फलनिष्पतीची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. जागतिक दर्जाचे डॉक्टर्स नाशकात येणार आहेत त्यामध्ये नेत्ररोग दंत रोग, कर्क रोग, स्त्री रोग,मूत्र पिंड विकार,अस्थि रोग, प्लास्टिक सर्जरी, बाल रोग,किडनी रोग, हृदय रोग, छाती व नाक-कान-घसा रोग,त्वचा रोग, मेंदू विकार आदि विभागांचे तज्ञ यावेळी उपचार आणि शस्त्रक्रिया करणार आहेत. असेही नाईक पुढे म्हणाले.यावेळी त्यांनी आरोग्य शिबिर दरम्यानच्या नियोजन समित्यांची जबाबदारी व माहिती दिली.