Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तौक्ते : मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्यांपैकी 177 जणांची नौदलाकडून सुटका

तौक्ते : मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्यांपैकी 177 जणांची नौदलाकडून सुटका
, मंगळवार, 18 मे 2021 (16:02 IST)
जाह्नवी मुळे
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण चार ठिकाणी सध्या बचावकार्य सुरू असल्याचं नौदलानं सांगितलं आहे.
 
सोमवारी (17 मे) अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे उधाण आलं होतं. त्याचा तडाखा बॉम्बे हाय आणि सागर भूषण तेलविहीरीजवळील बोटींना बसला. बॉम्बे हायजवळून 177 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
 
त्याशिवाय कुलाब्याजवळही एका बार्जवरून लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे.
कुठे कुठे बचाव कार्य सुरू आहे?
बॅाम्बे हाय तेलक्षेत्राजवळ P305 हा बार्ज भरकटला असून त्यावर 273 जण अडकल्याची माहिती नौदलाला मंगळवारी मिळाली होती. बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळपास 175 किलोमीटरवर आहे.
 
INS कोची ही नौदलाची बोटी बचावकार्यासाठी बॉम्बे हायच्या दिशेनं दुपारीच बाहेर पडली. रात्री साडेअकरापर्यंत बार्ज P305 वरून सुमारे साठ जणांना वाचवण्यात आलं. पण अंधार आणि वाऱ्याच्या वेगामुळे बचावकार्य थांबवावं लागलं.
मंगळवारी सकाळी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. आतापर्यंत या बार्जवरून 177 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती नौदलानं दिली आहे. INS कोचीसोबत INS कोलकाता या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहल्या आणि ओशन एनर्जी या बोटींसोबतच नौदलाची हेलिकॉप्टर्सही बचावकार्यात सहभागी झाली आहेत.
 
नौदलानं दिलेल्या माहितीनुसार हा बार्ज बुडाला आहे.
 
कुलाब्याजवळील समुद्रात गल कन्स्ट्रक्टर या आणखी एका बार्जवर 137 जण अडकले होते. तिथे वॉटर लिली हे टोईंग जहाज आणि कोस्ट गार्डचं सम्राट हे जहाज मदतकार्यात गुंतले आहेत. ही जागा मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात जवळपास 88 किलोमीटरवर आहे.
त्याशिवाय सागर भूषण तेल विहीरीजवळ 101 जण अडकले असून, तिथल्या SS-3 या निवासी बार्जवरही 196 जण अडकले आहेत. ही जागा गुजरातच्या पिपावाह बंदरापासून 50 नॉटिकल मैल म्हणजे जवळपास 92 किलोमीटरवर आहे. नौदलाची INS तलवार तिथे बचावकार्यासाठी गेली आहे.
 
बार्ज म्हणजे काय?
बार्ज म्हणजे मोठ्या आकाराचं, सपाट तळ असलेलं जहाज. तेल उत्पादन क्षेत्रात अशा बार्जेसचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो.
 
अनेकदा समुद्रातील तेलविहिरींवर काम करणारे कर्मचारी अशा बार्जवर वास्तव्य करतात. बॉम्बे हाय आणि सागर भूषण जवळ समुद्रात भरकटलेले बार्ज अशाच प्रकारचे निवासी बार्ज असल्याची माहिती मिळते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ, प्रमाण अत्यंत कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत