भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापलं की प्रकरणं बाहेर काढली जातात. पण ही प्रकरणं दाबली जातात की आणखी काय होतं ते कळत नाही. सर्व प्रकरणे तात्पुरती बाहेर काढली जातात. राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, असं सांगतानाच पाच वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा टोला लगावला. केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहेत. तरीही या संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. सीबीआयकडे एक हजार खटले प्रलंबित आहेत, असं सांगतानाच सत्ता गेल्यावरच भाजपला सर्व प्रकरणे आठवू लागतात, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी कोरोना नसतानाही त्यांनी कितीवेळा अधिवेशनं घेतली याची भाजपने माहिती घ्यावी. त्यानंतरच बोलावं. कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी अधिवेशनाला राजकीय रंग देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच येणाऱ्या अधिवेशनात सरकारकडून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपला निवडणुका जिंकून सत्ता मिळवता येत नाही तर तोडफोड करून सत्ता मिळवता येते, हे जगजाहीर आहे. देशातील नागरिकांचे कोरोना काळात मोदी सरकारने हाल केले. हे सर्व पुसून टाकण्यासाठी राज्यांतील सरकार पडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. येणाऱ्या नवडणुकीत आघाडीला चांगलं यश मिळेल आणि भाजप राज्यातून संपेल, असा दावाही त्यांनी केला.