नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने शनिवारी रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाला होता. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संबंधित युवकाला रविवारी सकाळीच नोटीस बजावण्यात आली. पोलीस आणि मंदिर सुरक्षारक्षकांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळल्यावर तणाव निवळला. आता त्र्यंबकेश्वर शहर अथवा मंदिरात कोणताही तणाव नाही, असे पोलिसांनी सांगितले.
याआधी त्र्यंंबकेश्वर पुरोहित संघ ब्राह्मण महासंघ मराठा, महासंघ यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान त्रंबकेश्वर पोलिसांनी दोन्ही समाजातील घटक तसेच शांतता समिती यांची बैठक घेतली.
दुसरीकडे या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात
मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor