मुंबई परिसरातील असलेल्या भिवंडीमधील ६ मुजोर रिक्षा चालकांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एसटी चालकाच्या मृत्यू झाला. त्याविरोधात महामंडळाच्या चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. यामध्ये ठाणे, भिवंडी, नांदेड, कंधार, बिलोली, मुरबाड, हदगाव, तसंच कल्याणचे एसटी डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.तर आज सकाळपासून मुंबई येथील मृत कर्मचारी प्रभाकर गायकवाडांना श्रध्दांजली वाहून मुंबई सेंट्रल, परळ डेपोमध्ये एसटी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन सुरु केले असून दोन्ही आगरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे आता मुंबईचे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
रिक्षा हटवण्याच्या वादावरुन बुधवारी रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या मुजोरी विरोधात आणि न्याय मिळावा म्हणून कर्मचारी वर्गाने हा मोठा बाद पुकारला आहे.
आंदोलनादरम्यान चालक आणि वाहकांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर यावर राज्य सरकारने लवकर पावले उचलली नाही तर मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.