बीड तालुक्यात सफेपुर गावात ऊसतोड कामगाराचा मृतदेह केजच्या शिक्षक कॉलोनीतील एका इमारतीमध्ये मुकादमच्या घरी आढळला. सदर मयत कामगाराचे नाव बाळासाहेब सोपान घोडके वय वर्ष 40 आहे. ऊसतोड मजूर घोडके यांचे केज येथील मुकादम जीवराज केशव हांगे आणि त्यांचे भाऊ बाबुराव केशव हांगे या भावांनी 29 ऑक्टोबर रोजी अपहरण करून घोडके यांना केज येथील कॉलोनीतील तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते.
घोडके यांची पत्नी एका कारखान्यावर गेली होती. तिला परत आल्यावर तिचे पती मृतावस्थेत आढळले. तिने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. घोडके यांच्या पत्नी मीरा बाळासाहेब घोडके यांनी मुकादम जीवराज हांगे आणि बाबुराव हांगे या दोघा भावांवर विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अपहरण करून खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची तपास करत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अशी माहिती प्रधान पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली आहे. जो पर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत नाही तो पर्यंत पतीचे प्रेत ताब्यात घेणार नाही अशी मागणी बाळासाहेब यांची पत्नी आणि नातेवाईकांनी केली आहे.