Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्याच बंदुकीतूनच सुटली; बॅलेस्टिक अहवाल

sada sarvankar
, शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (07:50 IST)
मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रभादेवी परिसरामध्ये झालेल्या राड्यावेळी स्वत:जवळ असणाऱ्या बंदुकीमधून गोळी झाडल्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर चर्चेत आले होते. याप्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील राड्यावेळी झाडण्यात आलेली गोळी ही सदा सरवणकर यांच्या बंदुकीतूनच निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॅलेस्टिक अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, ते पाहावे लागेल.
 
दरम्यान, गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीमधून गोळी सुटली होती, ती सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटल्याचे समोर आले आहे.
 
पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसे आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जप्त केलेली काडतूसे आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात १५ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता.
 
नेमके वादाचे कारण काय?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरामध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. परंतु या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अथिया-केएल राहुल “या” तारखेला अडकणार लग्नबंधनात