स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्कीट निर्माण करण्यात येणार आहे. येत्या रविवारी याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
नाशिक येथील भगूर हे सावरकरांचे जन्मस्थान आहे. येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने याकरिता पुढाकार घेतला असून येत्या २६ फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकर पुण्यतिथी निमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजनही पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास असंख्य सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. भगूरमधील सावरकर वाडा येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थितीत राहणार आहेत.
खासदार हेमंत गोडसे तसेच देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी असे असंख्य सावरकरभक्त उपस्थिती राहणार आहे. स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अष्टभुजा देवीची पालखीही सहभागी असणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.
वीर सावरकर पर्यटन सर्कीट
भगूरमधील या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातील पहिल्या वीर सावरकर पर्यटन सर्कीटची घोषणा करण्यात येणार आहे. या पर्यटन सर्किट मध्ये सावकर यांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभूजा देवी मंदिर, अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, दादर शिवाची पार्क येथील सावरकर स्मारक, सांगलीतील बाबाराव सावरकर स्मारक यासह सावरकरांशी निगडीत ठिकाणांचा पर्यटन सर्किट मध्ये समावेश आहे. तर भगूर येथे बनत असलेले थीम पार्क महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
Edited By-Ratnadeep Ranshoor