Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींचा मुंबई दौरा लांबणीवर

राहुल गांधींचा मुंबई दौरा लांबणीवर
, बुधवार, 15 डिसेंबर 2021 (07:49 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील मेळाव्याला परवानगी द्यावी म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसने अखेर हा मेळावाच रद्द केला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.
 
भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट आहे. त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करत काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असं भाई जगताप यांनी सांगितलं. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर २८ डिसेंबर रोजी हा मेळावा होणार होता. या मेळाव्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. आम्ही १५ दिवसांपासून राज्यसरकारकडे मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो, असं भाईंनी सांगितलं. तसेच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
हा मेळावा रद्द झाल्याचं आम्ही राहुल गांधी यांच्या कार्यालयात कळवलं आहे. पण नवी तारीख जाहीर झाल्यावर शिवाजी पार्कातच राहुल गांधी यांचा मेळावा होईल, असं सांगतानाच काँग्रेसच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
काँग्रेस नेते नसीम खान यांनीही या मेळाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांची मुंबईत सभा होण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने हा मेळावा होणार आहे. ही सभा झाली पाहिजे. याचा मविआ सरकार विचार करेल, असं नसीम खान म्हणाले. हा विषय फार तांत्रिक आहे. शासन निर्णय होत नाही तोपर्यंत कोर्टात जाणं योग्य नाही. त्यामुळेच आम्ही कोर्टातून याचिका मागे घेतली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत गुप्त मतदान घ्या : चंद्रकांत पाटील