एका शेतकऱ्याने आपले नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करत पुष्पगुच्छ नाही तर थेट कोथिंबीरची जुडी भेट म्हणून दिली. ही भेट आणखीन कोणाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे पवार यांनी सुद्धा तितक्याच प्रेमाने त्या कोथिंबीरच्या जुडीचा स्वीकार केला.
शुभेच्छा देतांना नेहमीच पुष्पगुच्छ दिला जातो. मात्र एका शेतकऱ्याने शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर चक्क कोथिंबीरची जुडी भेट म्हणून दिली. साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी शरद पवार नाशिकमध्ये आले होते. यावेळी रोहित मते या युवा शेतकऱ्याने शासकीय विश्रामगृहात शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्याने शेतात पिकवलेली कोथिंबीरची जुडी भेट म्हणून दिली. सुरुवातीला सुरक्षा रक्षकाला आंदोलक असल्याचा संशयही आला मात्र समजल्यावर त्यांनीही विरोध केला नाही. शरद पवार यांनी प्रेमाने कोथिंबीरच्या जुडीचा स्वीकार करत आपुलकीने चौकशी केली. सदरची कोथिंबीरीची जुडी अंगरक्षकाला गाडीत ठेवायला सांगितली. हे पाहून रोहित यांनी मोठा आनंद झाल्याशिवाय राहिला नाही. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम दादा कडलग समाधान कोठुळे, सुहास हंडोरे,प्रसाद कांडेकर, श्रावण कोठूळे उपस्थित होते.
रोहित मते यांची फेसबुक पोस्ट पुढील प्रमाणे :
माझ्या वडिलांची मिरासिगा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ।।
"भेट राजकीय विठ्ठलाची.."
आज सकाळी सुयोगाने पवारसाहेबांना भेटण्याची संधी मिळाली.वेळ सकाळची साहेबांना भेटायच तर काय भेट घेवून जावं...हारतुरे पुष्पगुच्छ घ्यावे तर ते रोज ढीगभर येतच असतात.
साहेब गाढे वाचक आहेत मनात आलं की चांगले पुस्तक घेवून जावे पण येवढ्या सकाळी ते भेटनं शक्य नाही..काय कराव,काय द्याव...?
मग क्षणात विचार आला साहेब #कृषिपुत्र #कृषिरत्न व्यक्तिमत्व...आपल्या शेतकऱ्यांसाठी लढणारा, त्यांच्या संकटकाळात धावून आपल्या पाठी सह्याद्री प्रमाणे उभे राहणारे साहेब..म्हणून माझ्या शेतातील कोथिंबीरीलाच पुष्पगुच्छ समजून माझ्या कृषिरत्न राजकीय विठ्ठलास अर्पण करावी असे मनोमन वाटलं..
साहेबांनी भेटीस येणाऱ्यांच्या भेट वस्तू स्वीकारल्या पण माझ्या ह्या शेतातील कोथिंबीरीस स्विकारून अंगरक्षकास गाडीत ठेवायला सांगितले..
शेतीची..शेतकऱ्यांची त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची जान आणि मान ठेवणारा हा शेतकऱ्यांचा कैवारी आज पुन्हा पहायला मिळाला.
धन्य झालो.....!
अभाळागत माया तुमची आम्हावरी राहू दे...