बारा सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह धरता? अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं.
काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी बारा सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली असता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
अचानक रणपिसे यांनी राज्यपालांना यासंदर्भात विचारलं. त्यावेळी मागेच उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, "हे माझे मित्र आहेत. सरकार यासंदर्भात आग्रह धरत नाही तर तुम्ही का धरता?" असा सवाल राज्यपालांनी केला. राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सूचक हास्य केलं. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आहे. या विषयावर नंतर बोलेन असं उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.