राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.
''राज्यपाल हे घटनात्मक पद असून, घटनेनुसार राज्य चालतंय का नाही, हे पाहणं त्यांचं काम आहे. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला, त्या शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे, आम्हाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, आमचा आत्मा आणि मन हिंदुत्वाचं आहे. आजच, पतंप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय की, महाराष्ट्राला अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे, जनतेची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं कौतुक करायला हवं, असा सल्लाच संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींना दिलाय. भगतसिंग कोश्यारी यांनी सेक्युलर घटनेला अनुसरुनच राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर योग्य असून तो ऐतिहासिक ठेवा असेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.