राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणवासीयांना दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे. त्यातच नऊ दिवस उलटूनही सरकारकडून कुणालाही, कोणतीही मदत मिळाली नाही, असा दावा करतानाच चक्रीवादळामुळे कोकणातील झालेलं नुकसान खूप मोठं असून सरकारने दिलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळाने तडाखा बसलेल्या गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील निवारा केंद्रांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीकास्त्र सोडले. 9 दिवस झाले तरी सरकारची कोणतीही मदत कोकणवासीयांना मिळालेली नाही. त्यामुळे लोक चिंतेत असून वाईट अवस्थेत राहत आहेत. ज्यांची घरे जमीनदोस्त झाली त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले असून या रिलीफ केंद्रांची खुराड्यापेक्षाही वाईट अवस्था आहे. काही लोकांचं बस स्टँडवर पुनर्वसन केलं आहे. मात्र, बस स्टँड गळत असल्याने स्थानिकांचे हाल होत असून या सर्वांना चांगल्या रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर केली आहे. पिकांचं नुकसान झाल्यानंतर अशा प्रकारची मदत आपण करतो. पिकांचं नुकसान पुढच्या वर्षी भरून निघत असतं. पण या ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. आता पुन्हा झाडे लावल्यानंतर दहा वर्षानंतर शेतकर्यांना त्यातून नफा मिळणार आहे. म्हणजे नऊ वर्ष या शेतकर्यांना नुकसान सोसावं लागणार असल्याने हेक्टरी मदतीचे निकष सरकारने बदलले पाहिजे. सरकारने पॅकेजमध्ये सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. ती हटवणे गरजेचे असून रोजगार हमी योजना किंवा तत्सम योजनेतून ही झाडे काढली पाहिजेत, असंही ते म्हणाले.
नऊ दिवसानंतरही कोकणातील वीज पुरवठा सुरू झालेला नाही. महाराष्ट्रभरातून टीम तयार करून सरकारने वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मगाणीही त्यांनी केली. कोकणातील हे तिसरं वादळ आहे. लॉकडाउन आणि वादळामुळे मच्छीमार व्यवसाय करू शकले नाहीत. त्यांच्या बोटी तुटल्या आहेत. या मच्छीमारांनी खासगी कर्जही घेतलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट आणि रोख मदत देण्यात यावी. सरकारकडून कोकणवासीयांना कोणतीही मदत दिलेली नसून वस्तुस्थिती पाहूनच वादळग्रस्तांना मदत जाहीर करावी, असे आवाहनही त्यांनी केलं. तसेच कोकणातील या पाहणी दौर्याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.