Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवास्तव बिल आकारले तर हॉस्पिटलला महापौरांनी दिला “हा” इशारा

अवास्तव बिल आकारले तर हॉस्पिटलला महापौरांनी दिला “हा” इशारा
, शुक्रवार, 28 मे 2021 (07:25 IST)
नाशिक शहरातील काही कार्पोरेट हॉस्पिटलने अवास्तव बिल आकारल्याने नागरिकांनी आंदोलन केले. त्यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी, आ. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी रामायण निवासस्थान येथे महानगरपालिकेचे मुख्य लेखापरिक्षक सोनकांबळे, वोक्हार्ट हॉस्पिटलसाठी नियुक्त असलेले लेखापरिक्षक तसेच वोक्हार्ट हॉस्पिटलचे संचालक प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करुन माहिती जाणुन घेतली.
 
याबाबतीत तातडीने लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले असून काही तक्रारी असल्यास संबंधित हॉस्पिटलवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. याच अनुशंगाने मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.
 
शहरातील हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना काही कार्पोरेट हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांकडून बिलांच्या बाबतीत लूट केली जात आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरातील डॉक्टरांची बदनामी होत आहे. वास्तविक काही डॉक्टर चांगल्या पद्धतीने कामकाज करून मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. तसेच रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवत आहेत त्यांच्या बाबतीत जनतेमध्ये आदरच आहे परंतु शहरातील कार्पोरेट हॉस्पिटल आहेत ते केवळ पैसे कमवण्यासाठी आलेत की काय? अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांकडून बिले आकारत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी आयुक्त व सर्व पदाधिका-यांनी चर्चा केली. 
 
लेखापरीक्षण विभागामार्फत अशा हॉस्पिटल मधील रुग्णांच्या बिलांची तपासणी करून खरोखरच रुग्णांना देण्यात आलेले बिल हे बरोबर आहे की नाही याबाबतीत तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये असलेले व हॉस्पिटलला लागून असलेल्या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बिलांची आकारणी केली जाते. त्यावरही नियंत्रण असणे गरजेचे असून याबाबतीत फार्मसी महाविद्यालयाची मदत घेऊन अशा स्वरूपाच्या बिलांवर कंट्रोल आणावा व फुड ॲन्ड ड्रग्ज यांच्या मार्फतही नियंत्रण आणून रुग्णांना देण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी केली गेली पाहिजे याबाबतीत चर्चा करण्यात आली. 
 
याप्रसंगी आयुक्त कैलास जाधव यांनी सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलचे बिल तपासण्यासाठी असलेले हॉस्पिटलसाठी नियुक्त लेखापरिक्षण कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे तसेच ते योग्य प्रकारे कामकाज करतात की नाही यासाठी शासनाच्या इतर विभागातून 12 लेखाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
याबाबतीत नाशिक शहरातील नागरिकांना काही शंका किंवा तक्रारी असतील तर त्यांनी महानगरपालिकेच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करुन आपली तक्रार नोंदवावी तसेच नागरीकांच्या सोयीसाठी येत्या दोन-तीन दिवसात महापौर यांचे निवासस्थान असलेले रामायण येथे नव्याने यंत्रणा उभारण्यात येऊन हेल्पलाइन सेंटर सुरू करणार असुन त्यावर नागरीकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. याची दखल तातडीने घेण्यात येईल, असे महापौर सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.
 
शहरात असलेले हॉस्पिटल तसेच कार्पोरेट हॉस्पिटल तसेच मुंबई पुण्यासारखी हॉस्पिटल नाशिक शहरात असायला पाहिजे परंतु त्याठिकाणी देण्यात येणार्‍या हॉस्पिटलच्या सेवांचा दर्जा शहरातील हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे वास्तववादी राहून त्यांनी रुग्णांची सेवा करावी आणि नियमाने असणारे बिल आकारावे आम्ही त्यांच्यासोबत राहू परंतु अवास्तव बिल आकारून रुग्णांची पिळवणुक करीत असाल तर त्या हॉस्पिटलला कुलूप लावण्याचे काम देखील मनपाच्या माध्यमातुन करण्यात येईल, असे महापौर सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय