Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे गटाचं नाव 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि एकनाथ शिंदे गटाचं नाव 'बाळासाहेबांची शिवसेना'

uddhav eaknath shinde
, सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (20:00 IST)
उद्धव ठाकरे यांच्या 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हांसाठी दिलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारला आहे. चिन्हांसाठी तीन नवे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आलं आहे.
 
त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही असं आयोगाने स्पष्ट केलं. मशाल हे चिन्ह उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीत नाही. समता पक्षाचं ते चिन्ह होतं परंतु 2004 मध्ये हा पक्षच बरखास्त झाला. त्यामुळे मशाल चिन्ह देण्यात येत आहे असं निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला सूचित केलं.
 
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव देता येणार नाही कारण एकनाथ शिंदे गटाने प्रथम प्राधान्य म्हणून हेच नाव सादर केलं आहे असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तुमच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
 
शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरता येणार नाही असं स्पष्ट केलं. तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव वापरता येईल असं स्पष्ट केलं. मात्र त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही तिन्ही चिन्हं धार्मिक भावनांशी संलग्न असल्याने वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाने शिंदे गटाला सांगितलं आहे.
 
तीन नव्या चिन्हांसाठी 11 ऑक्टोबर अर्थात मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय द्यावेत असं आयोगाने शिंदे गटाला सूचित केलं आहे.
 
दरम्यान आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठीचे पर्याय दिले होते.
 
त्यानुसार, शिंदे गटानं पुढील पक्षासाठी 3 नावांचा पर्याय सुचवला आहे.
 
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांची शिवसेना
शिवसेना बाळासाहेबांची
शिंदे गटानं चिन्हांसाठी 3 पर्याय सुचवले आहेत. यामध्ये,
 
त्रिशूळ
उगवता सूर्य
गदा
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, "ठाकरे गटाला त्रिशूळ आणि उगवता सूर्य घेण्याचा अधिकार नाही. ही निशाणी हिंदुत्वाची आहेत. त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्हांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. आता आयोग निर्णय घेईल."
 
विशेष म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरें गटांची दोन चिन्हं (त्रिशूळ आणि उगवता सूर्य) सारखी आहेत. तर पक्षासाठी सुचवलेलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नावसुद्धा सारखंच आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय शनिवारी (08 ऑक्टोबर ) घेतला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत तीन नावांचा तसंच चिन्हांपैकी एक मिळावं यासाठी पत्र दिलं.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नावासाठी खालील तीन पर्याय दिले आहेत.
 
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे)
याबरोबरीने चिन्हासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत.
यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "लवकरात लवकर चिन्ह मिळालं तर आम्ही जनतेकडे जाऊन कौल मागू."
 
शिवसेनेनी उगवता सूर्य, मशाल या चिन्हांवर याआधी निवडणुका लढवल्या आहेत. तर त्रिशूळ हे देखील धनुष्यबाणाप्रमाणेच हिंदू देवतांचे आयुध आहे. त्यामुळे ते मागितले असण्याची शक्यता आहे.
नवीन चिन्ह हे कदाचित शिवसेनेसाठी क्रांती घडवेल -संजय राऊत
"एखादं चिन्ह गोठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इंदिरा गांधीदेखील अशाच परिस्थितीला सामोरं गेल्या होत्या. काँग्रेसचं चिन्ह तर तीनवेळा गोठवलं गेलंय, जनता दलाचंही चिन्ह गोठवण्यात आलं होतं. नावात काय आहे? शिवसेना नाव जरी गोठवलं तरी खरी शिवसेना कोणाची?, हे सर्वांना ठाऊक आहे," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
 
ते पुढे म्हणाले, "अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण' आणि 'शिवसेना' हे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप आहे."
 
या प्रकरणाचा तिढा कसा सुटू शकतो?
 
शिंदे आणि ठाकरे गटातील प्रकरणाचा तिढा कसा सुटू शकतो याबाबत आम्ही घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांना विचारले. त्यांनी सांगितले की "16 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराच्या व्याख्या स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. पण हे सर्व होण्यासाठी 5-6 महिने वेळ लागला असता.
 
"त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितलं. सेपरेशन ऑफ पॉवर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. त्यानुसार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत निर्णय देईल," डॉ. बापट सांगतात.
 
सद्यपरिस्थितीनुसार निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणात देखील गुंतागुंत वाढली आहे. दोन्ही गटांनी एकसारखीच नावे मागितली आहेत. एकसारखीच चिन्हं मागितली आहेत. अशा वेळी काय होऊ शकतं असं विचारलं असता बापट सांगतात, "इंग्लंडमध्ये कायदा आहे त्यानुसार ज्या पक्षाने आधी चिन्ह मागितले त्यांना दिले जाते. पण भारतात नेमके कसे होईल याबाबतचा अंदाज आताच घेता येऊ शकणार नाही. जी चिन्हांवर विरोधी गटाने दावा केला नाही कदाचित ते चिन्ह दिलं जाऊ शकतं."
 
 
 
Published By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PKL 2022 : यू मुंबा वि यूपी योद्धा सामना