कर्नाटकात काही समाजकंटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याची नाराजी पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "कर्नाटकात भाजपाचं राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे."
अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.