Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरच्या नातींनी छत्तीसगडमध्ये जाऊन केली आजीची हत्या, कट रचून पोलिसांनाही दिला गुंगारा

murder
, शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (09:53 IST)
छत्तीसगड जिल्ह्यातील दुर्ग इथं एका वृद्ध महिलेची जुलै महिन्यात हत्या झाली होती. या हत्येचं नागपूर कनेक्शन आता समोर आलं आहे. ही हत्या या महिलेच्या दोन्ही नातींनी केल्याचं उघड झालं आहे. छत्तीसगड पोलिसांनी आरोपी बहिणींना अटक केली आहे.
 
पण अवघं 18 वर्ष वय असलेल्या नागपुरातल्या तरुणीनं अल्पवयीन बहिणीला सोबत घेत आजीची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
या मृत वृद्ध महिलेचं वय 56 वर्षं होतं. त्या छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यातील उत्तई पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.
 
मृ वृद्धेच्या मुलीचा विवाह नागपुरात झाला होता. त्या नागपुरातील आवळेबाबू चौकात राहतात. त्यांना दोन मुली आहेत. त्या दोघींपैकी एक 18 वर्षांची तर एक अल्पवयीन आहे.
 
या दोन बहिणींपैकी 18 वर्षांच्या तरुणीने लहान अल्पवयीन बहिणीच्या साथीनं सख्ख्या आजीची हत्या केली.
 
छत्तीसगड पोलिसांनी नागपुरातल्या पाचपावली पोलिसांच्या मदतीनं या दोन्ही आरोपी बहिणींना नागपुरातून अटक केली असून त्यांनी आजीच्या हत्येची कबुली दिली आहे.
 
थेट छत्तीसगड गाठून अशी केली आजीची हत्या
छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणी 24 जुलैला छत्तीसगड एक्सप्रेसने नागपुरातून दुर्ग याठिकाणी पोहोचल्या होत्या.
 
त्यानंतर त्या दुपारी रिक्षाने आजी राहत असलेल्या अपार्टमेंटमधील घरी पोहोचल्या. त्यांच्या आजीनं दरवाजा उघडताच मोठ्या बहिणीनं आजीचं तोंड हातानं दाबलं आणि लहान बहिणीच्या मदतीनं आजीचे हात-पाय ओढणीने बांधले.
 
त्यानंतर लहान बहिणीनं स्टीलच्या बाटलीनं आजीच्या डोक्यावर वार केले. त्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
 
हत्येमागचे नेमके कारण काय?
पण, या दोघींनी आजीची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होतं. याचं उत्तर देताना, दोन्ही बहिणींनी फक्त संपत्तीसाठी आजीची हत्या केल्याचं छत्तीसगड पोलिसांनी सांगितलं.
 
आजीची हत्या करून तिच्या शरीरावरील आणि आलमारीत ठेवलेले दागिने, 30-40 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, घराची कागदपत्रं, एटीएम कार्ड, बँक पासबूक, एफडीची कागदपत्रं, कार आणि अ‍ॅक्टिव्हाची चावी घेऊन दोन्ही बहिणी बाहेर पडल्या.
 
आजीचा मृतदेह तसाच ठेवून घर बंद करून त्या दोघी गेल्या. घराखाली ठेवलेली दुचाकी घेऊन दोघीनींही राजनांदगाव गाठलं.
 
दुचाकी तिथंच सोडून दोघीही बसमधून नागपूरला पोहोचल्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून, त्यांनी दुचाकी नागपुरातल्या रेल्वे रुळाजवळ सोडली.
 
अज्ञात चोरांनी या दुचाकीची चोरी केली. तर, मृत आजीचे चोरलेले दागिने आणि कागदपत्रं या दोघींनी एका ओळखीच्या व्यक्तीजवळ ठेवले.
 
छत्तीसगड पोलिस एक महिन्यापासून आरोपीचा शोध घेत होते. त्यादरम्यान तरुणींचा शोध घेत पोलीस नागपुरात आले होते.
 
सुरुवातीला दोघी बहिणींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पुरावे गोळा करून कसून चौकशी केल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर दोन्ही बहिणींनी गुन्हा कबूल केला.
 
छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्याकडून मृत आजीचे एकूण 4 लाख रुपयांचे दागिने आणि संपत्तीची कागदपत्रं जप्त केली असून 18 वर्षीय आरोपी तरुणीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
 
तसंच अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचं एसडीओपी आशीषकुमार बंछोर यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
 
असा झाला हत्येचा खुलासा
घटनेच्या दोन दिवसानंतर मृत वृद्ध महिलेच्या मामाची मुलगी त्यांच्या घरी आली होती. पण, घराला कुलूप होतं. दोन दिवसांपासून घराला कुलूप असल्याचं शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं.
 
त्यांनी वृद्ध महिलेला फोन केला, तर त्यांचा फोनही बंद येत होता. त्यामुळं त्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करताच त्यांना धक्का बसला. घरात वृद्धेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला होता. त्यांच्या मृतदेहाला किडे लागले होते.
 
त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना हत्येचा संशय आला. पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरू केला.
 
मृत वृद्धेची बहीण आणि सूनेची चौकशी केली. त्यावेळी नागपुरातल्या 18 वर्षीय नातीनं वृद्धेला पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना त्यांच्याकडून समजलं.
 
पोलिसांनी नागपूर गाठून या दोन्ही बहिणींची चौकशी केली. त्यांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. पण अखेर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानं हा प्रकार समोर आला.

Published By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नीरज चोप्रा डायमंड लिगमध्ये दुसऱ्या स्थानी