अहमदनगर पारनेर तालुक्यात १९८२ मध्ये दरोडा टाकणारा आणि शिक्षा लागल्यापासून १५ वर्ष फरार असलेला दरोडेखोर सुरेश महादू दुधावडे याला अटक करण्यात आले आहे. ह्या आरोपीला पुणे येथील ठाकरवाडी (ता.जुन्नर) परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नारायणपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यात ३८ वर्षांपूर्वी पडलेल्या दरोड्यात आरोपी सुरेश महादू दुधावडे (हल्ली रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) याला अटक करण्यात आले होते.त्याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याने या शिक्षेविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले. खंडपीठाने या अपिलावर सुनावणी झाल्यावर दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला दोषी धरले होते.
आरोपी दुधावडे हा दि. १४ ऑक्टोंबर २००५ पासून जामीन सुटल्यावर फरार झाला. दरोड्याच्या वेळेस तो वाडेगव्हाण येथे तात्पुरत्या स्वरुपात राहण्यास आलेला होता. त्याचा कोणताही पत्ता मिळत नव्हता.खंडपीठाने त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार बबन मखरे,विशाल दळवी, सुरेश माळी, संदीप दरंदले, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांचे पथक स्थापन केले. या पथकाने आरोपीचा शोध घेतला. तो नारायणपूरजवळील ठक्करवाडी येथे राहत असल्याचे आढळून आले.नारायणपूरचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताठे आणि पोलिस अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने त्यास अटक केली.