सोलापूर जिल्ह्यात बार्शीसारख्या व्यापारीपेठेत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पारधी समाजातील भोळ्या मंडळींनी ‘कोरोना’ देवीची स्थापना केली आहे. या कोरोनादेवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे, बोकडांचाही नैवेद्य दिला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
या घटनेची दखल घेत पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बार्शीत सोलापूर रस्त्यावर असलेल्या पारधी वस्तीत कोरोनादेवी स्थापना केली आहे. याप्रकरणी सोमनाथ परशुराम पवार (वय ४२) व ताराबाई भगवंत पवार (वय ५२) या दोघांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम ५२ खाली गुन्हा नोंदविण्यात आल्याचे बार्शीचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले आहे.