Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

दुष्काळी लातूर शहराला पाच अधिग्रहीत विहीरीतून प्रतिदिन 3 लाख 33 हजार लिटर पाणी मिळणार

दुष्काळी लातूर शहराला पाच अधिग्रहीत विहीरीतून प्रतिदिन 3 लाख 33 हजार लिटर पाणी मिळणार
, शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (10:58 IST)
या वर्षी माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत लातूर जिल्हयात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. लातूर जिल्हयावर पाणी टंचाईचे भीषण संकट ओढवले होते. त्यातच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच लातूर शहरातील गणेश विसर्जनासाठीच्या पाच सार्वजनिक विहिरींत पाणी नव्हते. व वर्षानुवर्षे या ठिकाणी गणेश विसर्जन व निर्माल्य टाकले गेल्याने विहिरींचे नैसर्गिक पाणी स्त्रोत बंद झालेले होते. तसेच लातूरकरांवर गणेश विसर्जन कोठे करायचा हा प्रश्न उभा राहिला. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हयात झालेला अत्यल्प पाऊस व मांजरा धरणातील कमी होणारा पाणी साठा यामुळे पानी टंचाई ची गंभीर परिस्थिती ओळखून लातूरकर नागरिकांना यावर्षी गणेशमुर्तीचे विसर्जन न करता दान करण्याचं आवाहन केले. व लातूर शहरातील पाच ही सार्वजनिक विहिरी कायमस्वरुपी अधिग्रहीत करुन त्या सर्व विहिरींचे पुर्नजीवन करण्याचे आदेश दिलेले होते.
 
त्यानुसार 1) शासकीय कॉलनी बार्शी रोड 2) सिंचन भवन औसा रोड 3) आर्वी श्री.तिवारी यांच्या शेतातील विहीर या तीन विहिरींचे पूर्णपणे पुर्नजीवन झालेले असून 4) गोरक्षण संस्था व 5) श्री. सिध्देश्वर मंदिर या दोन विहिरींच्या पुर्नजीवनाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
 
सध्याच्या स्थितीला भूजल यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक बी.एन. संगनवार यांच्या माहितीनुसार सिंचन भवन येथील विहीरीत 866 क्युबीक मीटर पाणी साठा झाला असून यातून प्रतिदिन 55 हजार लिटर पाणी मिळू शकते. तसेच शासकीय कॉलनीतील विहीरीतून 70 हजार लिटर पाणी प्रतिदिन मिळू शकते. या विहीरीत 916 क्युबीक लिटर पाणी साठा आहे. त्याप्रमाणेच आर्वी (तिवारी) येथील विहीरीत आजचा पाणीसाठा 447 क्युबीक मीटर पाणी असून जवळपास 70 हजार लिटर पाणी रोजी मिळू शकते. तर गोरक्षण विहीरीतून 78 हजार लिटर तर श्री. सिध्देश्वर मंदिरातील विहीरींतून 60 हजार लिटर पाणी रोजी मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
 
उपरोक्त पाच ही विहीरींची पाणी पातळी किमान 2 ते 6 मीटर इतकी आहे. या सर्व विहीरीत आजचा पाणी साठा जवळपास 3 हजार 884 क्युबीक मीटर इतका आहे. तर या विहीरीतून प्रतिदिन 3 लाख 33 हजार लिटर पाणी मिळेल. हया विहीरीतील पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असून हे पाणी रासायनिकदृष्टया पिण्या योग्य असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक संगनवार यांनी दिली.
 
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश उत्सवाच्या प्रारंभीच्या बैठकीतमध्येच सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना यावर्षी गणेश विसर्जनासाठी पाणी नसल्याने व पिण्याचे पाणी विसर्जनासाठी देणे शक्य नसल्याने सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सर्व गणेश मंडळांनी व लातूरकर नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व विसर्जनाच्या दिवशी विसर्जन ठिकाणी हजारो गणेश मूर्त्यांचे दान गणेश मंडळे व नागरिकांनी केले. व या पाच विसर्जन विहीरीं अधिग्रहीत करुन त्यांच्या पुर्नजीवनाचे काम हाती घेतले.
 
या कोरडया असलेल्या विहीरी पुर्नजीवीत करुन या विहीरीतून आजच्या घडीला प्रतिदिन 3 लाख 33 हजार लिटर पाणी मिळनार आहे. व हे पाणी पिण्या योग्य असल्याने लातूर शहरातील विहीरींच्या परिसरातील हजारो लोकांना पाणी उपलब्ध् करुन देणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
 
वर्षानुवर्षे गणेश विसर्जनासाठी वापरल्यामुळे पाच ही विहीरींचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झालेले होते. व हे स्त्रोत पुर्नजीवन करताना सुरु झाले. विहीरींचा गाळ काढण्यात येऊन खोलीकरण करण्यात आले. तसेच विहीरींचा वरील भागाचे बांधकाम करुन सुक्षित कठडे टाकण्यात आले. याप्रकारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या सहकार्यातून व लातूरकर नागरिकांच्या सक्रीय पाठींब्यामुळे पाच ही विहीरींचे पुर्नजीवन झाल्याने या विहीरीत काठोकाठ पाणी आले. हा विहिर पुर्नजीवनाचा प्रयत्न प्रचंड यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील इतर सार्वजनिक तसेच इतर जिल्ह्यातील विहीरींचे पुर्नजीवन करण्याची एक चळवळ निर्माण झाल्यास त्या त्या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न कांही अंशी निकाली निघेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस LIVE: यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवार उपमुख्यमंत्री