Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकन महिलेच्या पतीचा शोध सुरुच, प्रकृतीत सुधारणेनंतर महिलेला गोव्यातून सिंधुदुर्गात आणले

rape
, शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (15:48 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगलात साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या पतीचा शोध अजूनही सुरुच आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथकं तामिळनाडूत या महिलेचा शोध घेत आहेत.
दरम्यान गोव्यात उपचार घेत असलेल्या या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळं गुरुवारी रात्री उशिरा तिला सिंधुदुर्गात परत आणण्यात आलं. तिथं सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती.
विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर आली. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितलं.
महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा असल्याचं समोर आलंय.
महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा राज्यातील बांबोलीमच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
 
जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती, असं तिनं लेखी सांगितलं आहे. सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे स्पष्ट झालेलं नाही.
 
या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्रयत्न करणे, जीवाला धोका उत्पन्न करणे, बंदी बनवून ठेवणे असे गुन्हे अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. तपास अधिक वेगवान व्हावा यासाठी पोलिसांनी नवीन कायद्यानुसार म्हणजेच बीएनएस कलम 109 125, 127 (2) आणि 127 (6) कालमांप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.
 
पोलिस तपासात कोणत्या गोष्टींचा उलगडा?
पोलीस तपासात अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. तिच्याकडे सापडलेला मोबाईल व टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अमेरिकन दूतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
 
अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेक्षणची 2 पोलीस पथके गोवा, तर सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथकं तामिळनाडू येथे सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
 
या प्रकरणी महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या मडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. पण त्यामध्ये ही महिला कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 
याच स्थानकातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याचे समजते. त्याचबरोबर तिच्यासोबत जो मोबाईल होता त्याद्वारे तिने कोणाशी संपर्क केला हे समोर आल्यावर सर्व प्रकार उघडकीस येणार आहे.
 
घटनास्थळी परदेशी महिलेकडे सॅक, मोबाईल, टॅब व 31 हजार रुपये रोख सापडले होते. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
 
स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला. मोबाईलमधून तिने कोणाकोणाला कॉल केले तसेच या कालावधीत तिला कोणाकोणाचे कॉल आलेत हे उघड झाल्यानंतर या घटनेबाबत स्पष्टता येईल.
प्रथमदर्शनी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत आहे. पण त्याबद्दल काही नक्की बोलता येणार नाही, असं पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं.
 
या महिलेनं यापूर्वी दिल्ली, मुंबई, गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहे. महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रावरून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
महिलेनं तिचा नवरा तामिळनाडूमध्ये असतो असं सांगितलं आहे. त्याच्यावर आरोपही केले आहेत. त्यासाठी पोलिसांनी तामिळनाडूलाही एक पथक पाठवलं आहे.
 
या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत आहे. त्यामुळं पोलिसांनी पाठवलेल्या पथकांच्या चौकशीतून काही ठोस समोर आल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल असंही पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत.
 
गुराखी-शेतकऱ्यांना आला आवाज
शनिवारी जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या शेतकरी आणि गुराख्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळं त्यांनी जाऊन पाहिलं असता, त्यांना ही महिला बांधलेल्या अवस्थेत मिळाली.
 
त्यानंतर या महिलेला सोडवून तिच्यावर सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. अन्न-पाण्याविना राहिल्यामुळे या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर आहेत. या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी काही गुराखी आणि शेतकरी गुरं चरण्यासाठी गेले होते.
या परिसरात त्यांना महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेनं शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी जंगलामध्ये आत काही अंतरावर एका झाड्याच्या बुंध्याला एका महिलेच्या पायाला साखळदंड बांधून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती. अशाप्रकारे तिला पाहिल्यानं ते घाबरून गेले. त्यांनी लगेचच पोलिसांसह जवळपासचे गावकरी आणि पोलीस यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलीस याठिकाणी पोहोचले. त्यांना संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली आणि तातडीनं महिलेला उपचारासाठी नेले.
 
सुटका केली तेव्हा महिलेला काहीही नीट बोलता येत नसल्याचं समोर आलं. या महिलेला पोलिसांनी तिथून सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आज सकाळी तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
 
फोटो आणि व्हीडिओमध्ये पाहिलं असता, महिलेच्या शरीरावर कुठे फारशा जखमा दिसत नाहीत. मात्र, अनेक दिवसांपासून काहीही खाल्लेलं पिलेलं नसल्यानं त्या प्रचंड अशक्त झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.
 
पतीनेच बांधून ठेवले?
या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
पण महिलेला नीट बोलता येत नसल्यानं तिनं लिहायला कागद पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडले याबाबत माहिती दिली.
 
तिनं पतीनंच तिच्याबरोबर अशाप्रकारचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला आहे. पण त्यानं तिच्यासोबत नेमकं असं का केलं? किंवा इतर काहीही माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.
बोलता येत नसल्यामुळे लिहून सांगितले
पोलिसांनी महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने, नक्की काय घडलं आहे हे सध्या तरी सांगता येत नाही, असं म्हटलं आहे. पण महिलेनं स्वतः एका कागदावर लिहून तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं.
 
त्यानुसार, तिला कोणतं तरी इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळं तिच्या जबड्याची हालचाल होत नव्हती. परिणामी तिला तोंडानं साधं पाणी पिणंही शक्य नव्हतं.
 
या महिलेनं ती जंगलामध्ये अन्न पाण्याविना 40 दिवसांपासून अशा अवस्थेत होती असा दावा कागदावर लिहून केला आहे. मात्र एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
"माझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं होतं. याच जंगलात तुझा अंत होईल. मी पीडित असून यातून बचावले. पण तो याठिकाणाहून पळून गेला," असं महिलेनं लिहून सांगितलं.
 
योगाचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती महिला
जंगलात सापडलेली ही अमेरिकन महिला उच्चशिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती.
 
मात्र, ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आहे.
 
जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दूतावासाने गंभीर दखल घेतली आहे.
महिलेकडे सापडलेल्या आधारकार्डवर तामिळनाडू येथील रहिवासी पत्ता असल्याने बांदा पोलिसांचे दुसरे पथक हे तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले आहे. गोवा राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या ही अधिक असल्याने गुन्हे अन्वेक्षण शाखेचे 2 पथक हे गोव्यात तपासासाठी आज पाठविण्यात आले.
 
गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. मुंबईतही एक पथक पोलिसांनी पाठवलं होतं. सिंधुदुर्गातही सायबर सेलची दोन पथकं घटनेचा तपास करत आहेत. त्याशिवाय स्थानिक पथक आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारीही या प्रकरणाशी सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करत आहेत
 
तामिळनाडू मध्ये नक्की काय सुरू आहे तिथे कागदपत्रांची चौकशी कुठपर्यंत पोहोचली आहे, काय निष्पन्न झालं आहे? याबद्दल मात्र पोलीस अद्यापही बोलण्यास नकार देत आहेत.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीममध्ये हार्टअटॅकची भीती? व्यायाम सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्याल? वाचा 5 प्रश्नांची उत्तरं