महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरू केले आहे. आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झाली.
‘’राज्यात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. त्यात कार्यकर्त्यांचे काही गैरसमज होतात, अनेक ठिकाणी मतभेद होतात. महाराष्ट्रात तसे फार काही मतभेद नाहीत. पण जे काही थोडे-फार असतील, ते सामंजस्याने सोडवण्याचे यशस्वी प्रयत्न आज झाले,’’ असे मत या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, साताऱ्यातील सर्वच आमदार, जिल्हाध्यक्ष अशा सर्वांची बैठक आज आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि सर्वांनीच लोकसभा निवडणुकीसाठी एकदिलाने काम करण्याचे ठरवल्याचेही पाटील यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.