शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. हा निर्णय म्हणजे खोक्यांचा विजय आहे. हा निर्णय अपेक्षित होता. या निर्णयामुळे नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
ते म्हणाले, खोक्यांचा वारेमाप वापर करुन महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता. हा निर्णय दबावाखाली देण्यात आला आहे. देशातील सर्व स्वायत्त संस्थांना गुलाम करण्याचे हे तंत्र आहे. आता आम्ही नवीन चिन्ह व नाव घेऊन जनतेसमोर जाऊ. निवडणूक आयोग हे जनतेला विकत घेऊ शकत नाही. आम्ही जनतेसमोर हे मांडू. जनता आमच्या सोबत आहे. तसेच या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हानही देऊ. याचा कायदेशीर लढाई सुरूच राहिल. पण आज जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे. ही लोकशाहीची हत्याच आहे.
श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल तर सत्यमेव जयते संपले आहे. आता असत्यमेव जयते असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांनी तयार केलेली शिवसेना व चिन्ह आज ४० बाजारबुणगे यांनी विकत घेतले. निवडणूक आयोगाने जनतेचा विश्वास गमावला आहे. भविष्यात मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहणार नाही याचीही सुरुवात आहे. असे असले तरी जनता आमच्या सोबत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor