अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ५० खोके, गद्दार हाय हाय अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.
“महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” अशी विचारणा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. “मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य म्हणाले.