"महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आम्हाला पाहायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल" असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सचिन वाझेंवरून देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी आणि नंतर तपास असं होऊ शकत नाही. सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरून देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
"सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझेंकरता उद्धव ठाकरे वकील आहेत. सचिन वाझेंना डिफेंड करण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागतं. त्यामुळे त्यांना आता दुसरा वकील नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत त्यांना मुख्यमंत्री डिफेंड करत आहेत. अधिवेशनात सत्तारुढ पक्ष उघडा पडला. वरच्या सभागृहात प्रविण दरेकर आणि खालच्या सभागृहात आमच्या टीमने सरकारला निरुत्तर केले आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.