औरंगाबाद- जिल्ह्यातील भांगसीमाता गड परिसरात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी घडली ज्यात दोघांचा मृत्यू झाला. तर एकाचा वेरुळ परिसरात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
औरंगाबाद येथील भांगसीमाता गड परिसरात घडलेल्या घटनेतील दोघां तरुणांना रस्त्यात लागलेल्या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. परंतु पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत गारखेड्यातील तरुण मित्रांसोबत वेरूळच्या लेणी परिसरात गेला असताना तेथील कुंडात बुडून त्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं ?
वाळूज औद्योगिक परिसरातील खासगी कंपनीत काम करणारे प्रल्हाद राम चव्हाण, शेजारील बाळू अप्पा पालवे, त्यांचा तीन वर्षाचा मुलगा व पालवे यांच्या मेहुणा नितीन रमेश गुंडाळे हे रविवारी भांगसीमाता गडावर गेले होते. गडावर दर्शन घेऊन ते दुपारी चार वाजता गडावरून खाली उतरले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील झाडाखाली बसून त्यांनी घरुन आणलेल्या डब्यातून जेवण केले. पाच वाजेच्या सुमारास घराकडे निघाले असता वाटेत वंजारवाडी शिवारात मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. प्रल्हाद व नितीनला पोहू लागले तर सोबत तीन वर्षांचा मुलगा असल्याने बाळू यांनी काठावरच थांबण्याचा निर्णय घेतला. प्रल्हाद व नितीन वाहत्या पाण्यात बुडू लागले हे बघून बाळूने आरडाओरड सुरू केली परंतु तोपर्यंत दोघेही बुडाले.
दीड तासाने दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर दुसर्या घटनेत वेरूळ लेणीतील येळगंगा नदीवरील जोगेश्वरी मंदिरासमोरील कुंडात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन विजयप्रताप सहानी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गारखेड्यातील बाळकृष्णनगरात राहत होता.