Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘वाघ’हा जैवविविधतेचा मानबिंदू; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

sudhir munguttiwar
मुंबई , गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (07:31 IST)
जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्य शासनाचा वन विभाग प्रस्तूत दै. लोकसत्ता प्रकाशित ‘वाघ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाळ रेड्डी, महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर , दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदींची उपस्थिती होती.
 
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील उत्तम व्याघ्रप्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथील वाघांची संख्या वाढली आहे. वाघ संख्या वाढीच्या वेगात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशांत वाघ आढळतात. त्यापैकी 65 टक्के वाघ हे केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासन, वन विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
वाघ आणि इतर प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले जात आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वन्यप्राण्यांची शिकार होऊच नये, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. सर्व प्राण्यांच्या संरक्षणाचे प्रतीक हा वाघ आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे काम वन विभाग करीत आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेने हरित पट्टा क्षेत्रात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
दरम्यान, यावेळी ‘वाघ: अधिवासाचं आव्हान’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये प्रधान सचिव श्री. रेड्डी यांच्यासह श्री. टेंभुर्णीकर, श्री. लिमये, श्री. काकोडकर यांनी सहभाग घेतला.
 
यावेळी प्रधान सचिव श्री. रेड्डी म्हणाले की, राज्यात आपण 6 व्याघ्र संवर्धन क्षेत्र घोषित केले आहेत. वाघ ज्याठिकाणी आहे, तेथील कोअर एरिया मधील नागरी वस्ती पुनर्वसनाला आपण प्राधान्य दिले आहे. याशिवाय, वाघ संरक्षणासाठी राज्य व्याघ्र राखीव दल आपण तयार केले. या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याने त्यांची मदत घेऊन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. वाघाला त्याच्या अधिवासामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले, तर तो त्या बाहेर येणार नाही. यासाठी तेथील पीक पद्धतीचा विचार करुन काही बदल करण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता साधनांचा वापर करुन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करता येईल का, यासाठी आयआयटी, मुंबई यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
श्री. टेंभुर्णीकर यांनी, वाघांचा अधिवास सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनीही पर्यावरण आणि वन्यजीवांना नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनजागृती आणि शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. श्री. लिमये आणि श्री. काकोडकर यांनीही स्थानिकांच्या सहकार्याने आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने हे काम करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Anantnag Encounter:सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन लष्करी अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलिस डीएसपी शहीद